Bjp Leader Chandrakant Patil Sarkarnama
मराठवाडा

प्रचाराच्या धावपळीतही चंद्रकांत पाटील भजनात रंगले

(Bjp State President Chandrakant Patil)अंबरीष महाराज देगलूरकर यांच्यासह त्यांच्या साथीदारांच्या भजनात टाळ हाती घेऊन पाटील काहीकाळ भजनात दंग झाले.

सरकारनामा ब्युरो

देगलूर ः दौरे, बैठका, प्रचार आदींत व्यस्त असलेले राजकीय नेते कधी कधी आपली नित्याची वाट बदलून वेगळं काहीतरी करतात. कोणी शेतकऱ्यांसोबत बांधावर जाऊन भाजी-भाकरी खातं, तर कुणी बैलगाडी, ट्रॅक्टर चालवत शिवाराचा फेरफटका मारतं. राजकारण्यांच्या या वेगळ्या तऱ्हा त्यांच्या चाहत्यांना भावून जातात. देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीच्या निमित्ताने जिल्हा दौऱ्यावर आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील काहीकाळ भजनात दंग झाल्याचे पहायला मिळाले.

राज्यातील सत्तांतरानंतरची ही दुसरी पोटनिवडणूक असल्याने भाजपने ती प्रतिष्ठेची केली आहे. पंढरपूरच्या पोटनिवडटणुकीत महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्रित लढल्यानंतरही भाजपने ती जागा जिंकली. तोच प्रयोग ते देगलूर-बिलोलीत करू पाहत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना खतगांवकरांच्या घरवापसीने काही प्रमाणात धक्का बसला असला तरी त्यातून भाजप सावरण्याचा प्रयत्न करते आहे.

प्रचाराच्या धावपळीतही चंद्रकांत पाटलांनी भजनाला हजेरी लावत टाळ हाती घेतली. देवाचे नामस्मरण करत धावाही केला. आता त्यांच्या या भजनसेवेचा प्रसाद म्हणून देव पोटनिवडणूकीतील विजय भाजपच्या पदरात टाकतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. भजन, कीर्तन व प्रवचनाचा तीनशे वर्षाचा समृद्ध वारसा लाभलेल्या येथील धुंडा महाराज देगलूरकर संस्थानला चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी सुरु असलेल्या भजन सेवेत देखील ते सहभागी झाले.

अंबरीष महाराज देगलूरकर यांच्यासह त्यांच्या साथीदारांच्या भजनात टाळ हाती घेऊन पाटील काहीकाळ भजनात दंग झाले. धावपळीच्या दिनचर्येनंतर त्यांची सत्संगावरील भक्ती पाहून अनेकांना कुतूहल वाटले. एरवी सातत्याने विरोधकांवर शब्दरूपी बाण सोडणाऱ्या चंद्रकांतदादांमध्ये वारकरी दडल्याची प्रचिती देगलूरकरांना यानिमित्ताने आली.

देशसेवा करण्याची विविध माध्यमे असतात. सामाजिक समानतेचे अधिष्ठान असेल तर ती सेवा समाजाच्या उत्थानासाठी सत्कारणी लागते. संतांच्या सहवासातून मानवाला सुखाची प्राप्ती होते. देगलूरकर घराण्याचे संत परंपरेतील योगदान फार मोठे असल्याची भावना देखील चंद्रकांत पाटलांनी यावेळी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT