Chhatrapati Sambhajinagar News, 10 June : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर जी काही आकडेमोड झाली, त्यात मला कन्नड-सोयगाव मतदारसंघातून 35 हजार मतं मिळाल्याचे मी म्हणालो होतो. पण आता सखोल माहिती घेतली तेव्हा 35 नव्हे तर मला 45 हजार मतं या मतदारसंघातून मिळाली आहेत. हे माझ्यासाठी खूप मोठे यश आहे, असं मी मानतो, अशा शब्दात माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड-सोयगांवमधील मतदारांबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
मला मतं दिली तर इम्तियाज जलील निवडून येईल, या भितीपोटी मला लोकांनी मतदान केलं नाही, असा दावाही जाधव यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन सहा दिवस उलटले. विजयी उमेदवारांनी जल्लोष साजरा केला, तर पराभूत उमेदवारांनी पराभवाच्या कारणांचा शोध घेत आभार दौरे सुरू केले आहेत.
2019 मध्ये झालेल्या लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या कामगिरीकडे यावेळीही सगळ्यांचे लक्ष लागलं होतं. परंतु कुठल्याही परिस्थितीत मतांचे विभाजन आणि तिसऱ्याचा फायदा होऊ द्यायचा नाही, हे मतदारांनी ठरवलं होतं. प्रत्यक्षात घडलेही तसेच आणि हर्षवर्धन जाधव यांच्यासह अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या उदमेवारांचे डिपॉझिट जप्त झालं.
हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष निवडणुक लढवल्यानंतर त्यांना 45 हजार मते मिळाल्याचा दावा केला आहे. याआधी जाधव यांनी आपल्याला 39 हजार मतं मिळाली, त्यापैकी 35 हजार एकट्या कन्नड-सोयगाव मतदारसंघातून मिळाल्याचं सांगत नाराजी व्यक्त केली होती. आपली लायकी दाखवल्याबद्दल तुमचे आभार म्हणत जनतेच्या कामासाठी आता खासदार संदीपान भुमरे यांच्याकडेच जा, असा इशाराच त्यांनी दिला होता.
त्यानंतर आज पुन्हा जाधव यांनी आपल्याला कन्नड-सोयगांव मतदारसंघातूनच 45 हजार मते मिळाल्याचा दावा करत हे दैदिप्यमान यश असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे रागाच्याभरात आधीच्या व्हिडिओमध्ये मी जे बोललो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, असंही जाधव यांनी म्हटलं आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं सांगत त्यांनी पुन्हा कन्नडमधून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.