BJP Leader Raju Shinde Will Join Shiv Sena  Sarkarnama
मराठवाडा

Raju Shinde: राजू शिंदेंच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे शिंदें गटाचे आमदार शिरसाट यांची डोकेदुखी वाढणार

Mangesh Mahale

लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांच्या पराभवानंतर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत. शिवसंकल्प मेळाव्यातून आज ते विधानसभेचे रणशिंग फुंकणार आहेत.

छत्रपती संभाजी नगरात भाजपला मोठा धक्का बसणार असून माजी उपमहापौर राजू शिंदे (raju shinde) हे आज आपल्या समर्थकांसह उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याने या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

राजू शिंदे संभाजीनगर पश्चिम मधून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाली तर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांची डोकेदुखी वाढणार आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत राजू शिंदे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यांना सुमारे 42 हजार मते मिळाली होती. या वेळी त्यांना उद्धव ठाकरे संधी देतील, अशी चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना पश्चिम मतदारसंघातून 58,382 मते मिळाली आहेत. त्यावर शिंदे यांचे विजयाचे गणित आहे. यामुळे संजय शिरसाट यांच्यासमोर आव्हान उभे राहील, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

राजू शिंदे यांना रोखण्यासाठी भाजप नेत्यांनी घेतल्या सुमारे 7 ते 8 बैठका घेतल्या पण त्यांनी मनधरणी करण्यात भाजप नेत्यांना अपयश आले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे पराभूत झाले आहेत.

ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यातच खैरे यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. त्या तुलनेत राज्यात अन्य ठिकाणी ठाकरे गटाच्या उमेदवारांना चांगले मतदान झाले आहे. लोकसभेला संभाजीनगरात फटका बसल्याने उद्धव ठाकरे आता प्रत्येक पाऊल सावधपणे टाकत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ते स्वत: मैदानात उतरले आहेत.

या मेळाव्यात संभाजीनगरमधील दुसऱ्या पक्षांचे पदाधिकारी शिवबंधन बांधणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या बैठकांचे सत्र सध्या सुरू आहे. आजच्या मेळाल्यास पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

2029 मध्ये मतदारसंघाची फेररचना होणार आहे. त्यामुळे राजू शिंदेंना ही शेवटची संधी आहे, त्यामुळे त्यांनी ठाकरेंच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. कारण ही जागा महायुतीत शिंदे गटाचे संजय शिरसाट यांना मिळणार आहे. त्यामुळे राजू शिंदे यांनी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला असे बोलले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT