Chhatrapati Sambhajinagar .jpg Sarkarnama
मराठवाडा

Municipal Corporation : छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या 'जीबी'मध्ये पाणी प्रश्नावरून बोंबाबोंब, महापौर-नगरसेवकांत खडाजंगी

Chhatrapati Sambhajinagar water issue : नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत कशाही लाईन टाका? कामे कशीही करा पण शहरातील नागरिकांना पाणी कधी मिळणार? टप्पे कधी सुधारणार? याची माहिती द्या, वेगवेगळे दावे करतात, पण पाणी मिळत नाही, अशा शब्दांत शहरातील पाणी टंचाईवरून नगरसेवकांनी गुरुवारी (ता. २७) झालेल्या सर्वसाधारण सभेत संताप व्यक्त केला.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : पावणे तीन हजार कोटींची पाणीपुरवठा योजना देऊनही छत्रपती संभाजीनगरच्या नागरीकांना भर पावसाळ्यातही पाणी मिळत नाहीये. नळातून जे पाणी येते ते ही दुर्गंधीयुक्त, पिवळे, काळे असते. यावर नगरसेवकांनी आज महापालिका अक्षरशः डोक्यावर घेतली. पाणी प्रश्नावर बोलू दिले नाही म्हणत, नगरसेवक महापौरासमोर धावून गेले, तर न्यायालयाचा अवमान होईल म्हणत महापौर समीर राजूकर यांनी सभाच तहकूब केली.

नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत कशाही लाईन टाका? कामे कशीही करा पण शहरातील नागरिकांना पाणी कधी मिळणार? टप्पे कधी सुधारणार? याची माहिती द्या, वेगवगेळी दावे करतात पण पाणी मिळत नाही, अशा शब्दात शहरातील पाणी टंचाईवरून नगरसेवकांनी गुरुवारी (ता. २७) झालेल्या सर्वसाधारण सभेत संताप व्यक्त केला. चर्चेदरम्यान, दूषित पाण्याच्या तक्रारी तातडीने सोडविण्याचे आदेश महापौरांनी दिले पण त्यानंतर नव्या पाणी योजनेच्या चर्चेवरून गदारोळ होताच सभा तहकूब करण्यात आली.

महापौर समीर राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. २७) सर्वसाधारण सभा घेण्यात आली. त्यात शहरातील पाणीप्रश्‍नावर एमआयएमचे नगरसेवक मो. वाजेद मो. अय्युब, वंचितचे डॉ. कुणाल खरात, ठाकरे पक्षाचे गटनेते गणेश लोखंडे आणि सावित्री वाणी यांनी पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आणला. पडेगाव, मिटमिटा परिसरात पूर्वी मिळणारे पाणी आता बंद झाले असून, नंदनवन कॉलनीत मध्यरात्री पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी गणेश लोखंडे यांनी केल्या.

दररोज २५० एमएलडी पाणी मिळत असल्याचा दावा केला जात असताना शहराला ८-८ दिवसांनी पाणी मिळत नाही, असा सवाल करत नागरिकांना फक्त तारखा दिल्या जात असल्याचा टोला त्यांनी लगावला. चर्चेदरम्यान लोखंडे यांनी ३५० कोटींची पाणी योजना २७४० कोटींवर गेली तरी शहराला पाणी मिळत नाही? असा प्रश्‍न उपस्थित केला.

त्यावर भाजप नगरसेवकांनी आक्षेप घेत हे पाप उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहे, असा पलटवार केला. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यामुळे पाणी योजनेचे वाटोळे झाले, असा आरोप राजगौरव वानखडे यांनी केला. त्यावरून सभागृहात जोरदार गोंधळ उडाला. विशेष म्हणजे विरोधीपक्षनेते समीर साजेद बिल्डर यांनी ठाकरे सेनेची बाजू घेत ‘ते गटनेते आहेत, त्यांना बोलू द्या, अशी मागणी सभागृहात केली.

स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला. मात्र, ‘ही सर्वसाधारण सभा आहे, स्थायी समितीची नाही,’ असे सुनावत शिवसेनेचे गटनेते किशोर नागरे यांनी त्यांना रोखले. दरम्यान परस्परांवर वैयक्तिक आरोप करू नयेत व जुना इतिहास उकरू नये, अशा सूचना देत महापौरांनी वातावरण शांत केले.

समस्या उच्चस्तरीय समितीकडे मांडा..

नवीन पाणीपुरवठा योजना आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कामांबाबत नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या तक्रारींवर महापौरांनी भूमिका स्पष्ट केली. ‘न्यायालयाच्या आदेशानुसार या कामांवर सभागृहात चर्चा करण्यास मनाई आहे. नगरसेवकांनी आपल्या तक्रारी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीकडे मांडाव्यात, असा सल्ला राजूरकर यांनी दिला.

दरम्यान, नगरसेवक अमित भुईगळ यांनी आम्हाला ही भीती दाखवू नका, असे सांगत योजनेवर चर्चा करण्यची मागणी केली. महापौरांनी तुम्ही सभागृहात अशी भाषा वापरू नका, अशी तंबी भुईगळ यांना दिली. त्यानंतर सभागृहात पुन्हा गोंधळ झाला. त्यावर महापौरांनी राष्ट्रगीत सुरू करून सभेचे कामकाज संपवले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT