मराठवाडा

Chhatrapati Sambhjinagar Municipal Corporation : पाणी पुरवठ्याचे टप्पे कमी करण्यात अपयशाची कबुली, तरी महापौरांकडून व्हिजन 2047 संकल्प!

Vision 2047 Chhatrapati Sambhajinagar development plan : छत्रपती संभाजीनगर महापालिकेने पाणी पुरवठ्याचे टप्पे कमी करण्यात अपयश मान्य केले. तरीही शहर विकासासाठी महापौरांनी Vision 2047 ची मोठी घोषणा केली.

Jagdish Pansare

Mayor Sameer Rajurkar : महापालिकेत भाजपाची शतप्रतिशत सत्ता, सगळी महत्त्वाची पदं स्वतःकडे, तरुण, तडफदार महापौर आणि केंद्र व राज्यातील सत्तेचा भक्कम पाठिंबा असताना देखील नव्या महापौरांना पहिल्या शंभर दिवसात पाणी पुरवठ्याचे टप्पे कमी करता आले नाही. महापौर समीर राजूरकर यांनीच याची कबुली दिली. ही परिस्थिती असली तर विकसित छत्रपती संभाजीनगरसाठी व्हिजन 2047 चा संकल्प त्यांनी केला.

महापौरपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एप्रिल महिन्यातच पाणी पुरवठ्याचे टप्पे कमी करण्याचे ठरवले होते, परंतु त्यात आम्हाला पूर्ण यश आले नाही, अशी स्पष्ट कबुली महापौर समीर राजूरकर यांनी दिली. महापौर म्हणून शंभर दिवस पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'विकसित छत्रपती संभाजीनगर २०४७' चे व्हिजन मांडताना सिटी ट्रान्सफॉर्मेशन युनिटची स्थापना करण्याचा मनोदय व्यक्त केला.

पण ‘पुढील शंभर दिवसांनंतर तरी शहराला दररोज पाणी मिळणार का?’ या थेट प्रश्नावर मात्र त्यांना शाश्वती देता आली नाही. पाणी पुरवठ्यातील टप्पे कमी करण्याचे आमचे नियोजन होते, मात्र त्यात केवळ 30 ते 40 टक्केच यश आले. त्यामुळे टप्पे कमी करण्यापेक्षा पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक काटेकोरपणे कसे पाळले जाईल, याला आम्ही प्राधान्य दिले.

900 मिलिमीटर व्यासाच्या पाणी पुरवठा योजनेतून सध्या 13 एमएलडी पाणी वाढले असून, त्याचा शहराला उपयोग होईल. तांत्रिक अडचणी आणि विविध विभागांमधील समन्वयाच्या अभावातून मार्ग काढत नवीन योजनेचे पाणी शहराच्या वेशीपर्यंत आले आहे. नवीन योजनेतून 200 एमएलडी पाणी मिळण्यासाठी हायकोर्टाने 12 जूनची मुदत दिली आहे. ही मुदत पाळल्यास शहराला मोठा दिलासा मिळेल, असा दावा महापौरांनी केला.

असे असेल मिशन इम्पॉसिबल

महापौर समीर राजूरकर यांनी पुढील शंभर दिवसांसाठी डोळ्यासमोर एक मिशन घेऊन वाटचाल करणार असल्याचे यावेळी सांगीतले. यामध्ये पाणी पुरवठा सुरळीत करणे याला प्राधान्य असणार आहे. मिशन कर्मयोगी अंतर्गत प्रशासनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी विशेष अभियान तसेच 2020 च्या विकास नियंत्रण नियमावलीच्या आधारे सेल सुरू करणे यावर आपला भर असल्याचे राजूरकर यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT