Eknath Shinde | Shahaji Bapu Patil Latest News
Eknath Shinde | Shahaji Bapu Patil Latest News  Sarkarnama
मराठवाडा

स्वत: नांगुर ओढला, दावं घेऊन कुळव चालवलायं; मुख्यमंत्र्यांच्या काबाडकष्टाचं शहाजीबापूंनी केलं कौतुक

सरकारनामा ब्यूरो

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath SHinde) आज (ता.१२ सप्टेंबर) औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यांच्या या दौऱ्यात ते त्यांच्या गटाचे नेते आणि मंत्री संदिपान भूमरे यांच्या पैठण मतदारसंघात सभा झाली आहे. त्यांच्या या सभेकडे राज्याचं लक्ष लागले होते. त्यांच्या या सभेला शिंदे गटासह भाजपच्या नेत्यांनीही हजेरी लावली होती. यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड यांच्यासह अनेक मंत्री आणि शिंदे गटातील आमदार आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती.

यावेळी काय झाली, काय डोंगर, काय हाटेल..या डायलॅागमुळे प्रसिध्दीस आलेले सांगोला मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Patil) यांनीही भाषणं केले. यावेळी त्यांनी 'तो' डायलॉगही म्हणून दाखवला आणि मुख्यमंत्री शिंदेंनी केल्या काबाडकष्टाचं शहाजीबापूंनी कौतुकही केलं आहे.

शहाजीबापू म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदेंनी लहानपणापासूनच मोठी काबाडकष्ट केली आहेत. महाबळेश्वरच्या डोंगरातील, कोयना धरणाच्यावरली शेती ही तुमच्या-माझ्यासारखी नाही. त्या शेतीत बैलं चालत नाहीत, त्या ठिकाणी कुळव माणसांनाच ओढायचा असतो तसेच नांगुरही माणसांनाच धरायचा असतो. मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी स्वत: नांगुर ओढलाय, खांद्यावर दावं घेऊन कुळवं ओढलाय, चिखलात पाय बुडवून खाकी चड्डीवर भाताची रोपं पेरल्याती, एवढं कष्ट करुनही संसार चालत नसल्याने ते ठाण्याला आले. मात्र ठाण्याला गेल्यानंतर धर्मवीर आनंद दिघेंच्या आशीर्वादाने रिक्षा चालवायला सुरु केली होती. त्यावेळी रात्रं-दिवस रिक्षा चालवून घराचा प्रपंच केला. म्हणूनच, शिंदे हे आजही दिवसरात्र जागून काम करत आहेत. ज्या माणसाचं जीवनच जनतेच्या हितासाठी समर्पित झालं, तो माणूस झोपणार नाही, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं.

दरम्यान, मुख्यमंत्र्याकडून मराठवाड्याच्या पारड्यात झुकतं माप देण्यात आलं असून पहिल्याच मंत्रीमंडळात संदीपान भुमरे, अब्दुल सत्तारांना मंत्रीपद देण्यात आलं तर तानाजी सावंतांना कॅबिनेट मंत्री करण्यात आलं आहे. त्याचमुळे भुमरेंनी मुख्यमंत्री शिंदेंच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. मुख्यमंत्र्यांच्या सभेला आज मोठी गर्दी होती. मात्र, त्यांच्या या सभेच्या गर्दीवरून शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांनी मात्र जोरदार टीका केली आहे. त्यांच्या या टीकेचा समाचारही शहाजीबापूंनी आपल्या भाषणात घेतला. तसेच मुख्यमंत्री शिंदेंनीही आपल्या भाषणात चांगलीच टोलेबाजी केली आहे. आता त्यांच्या या टीकेला सेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT