Cm Eknath Shinde-Mla Santosh Bangar News Hingoli Sarkarnama
मराठवाडा

CM शिंदे हिंगोलीत : बांगरांच्या फार्म हाऊसचे उद्धाटन अन् कावड यात्रेतही सहभागी होणार...

एकंदरित मुख्यमंत्र्यांचा हिंगोली दौरा हा पुर्णपणे बांगर यांच्यासाठीच असल्याचे कार्यक्रमाच्या नियोजनावरून स्पष्ट होते. ( Mla Santosh Bangar)

सरकारनामा ब्युरो

हिंगोली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री नांदेडमध्ये दाखल होणार आहेत. नांदेड मध्यचे आमदार बालाजी कल्याणकर, (Hingoli) हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, कळमनुरीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्या समर्थनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या नांदेड-हिंगोली दौऱ्यावर येत आहेत. शिंदे गटाच्या बंडात बालाजी कल्याणकर हे सुरुवातीपासूनच होते, तर बांगर यांचे तळ्यात-मळ्यात विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी संपले.

त्यानंतर शिवसेनेच्या १२ खासदारांनी दिल्लीत शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला त्यात हिंगोलीचे खासदार हेमंतत पाटील देखील होते. या सर्व समर्थक आमदारांना त्यांच्या मतदारसंघात जाऊन बळ देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्याचा दौरा घोषित केला आहे. राज्याच्या कारभार, दिल्ली वाऱ्या सांभाळत शिंदे समर्थक आमदारांच्या मतदारसंघात देखील मेळावे, सभा घेत आहेत.

नांदेडहून उद्या हिंगोलीत दाखल होणारे एकनाथ शिंदे आपल्या दौऱ्यात बांगर व पाटील यांच्यासाठी हिंगोलीत जाहीर सभा देखील घेणार आहेत. विशेष म्हणजे आमदार बांगर यांच्या सावरखेडा येथील फार्महाऊसचे उद्धाटन देखील मुख्यमंत्री करणार आहेत. तत्पुर्वी बांगर यांच्याच कळमनुरी येथील बंगल्यात देखील शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार आहे.

दुपारी तीन ते सायंकाळी ७ या चार तासांच्या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन बांगर यांच्यावतीने करण्यात आले आहे. या शिवाय गेल्या ७ वर्षापासून आमदार बांगर यांच्याकडून कळमनुरी ते औढानागनाथ दरम्यान काढण्यात येणाऱ्या कावड यात्रेत देखील मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. अग्रेसन चौक नांदेड नाका ते औंढानागनाथ मंदिरापर्यंत साधरणतः ३ ते ४ किलोमीटर मुख्यमंत्री पायी या कावड यात्रेत सहभागी होणार असल्याचे बांगर यांनी सांगितले.

श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी कळमनुरी ते औढानागनाथ अशी ही कावड यात्रा काढली जाते. यात्रेत सहभागी होण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिला असल्याचेही बांगर यांनी सांगितले. तसेच सायंकाळी पाच वाजता हिंगोलीतील गांधीचौकात मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा देखील होणार आहे. सभेनंतर सायंकाळी ६ वाजता एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बांगर यांच्या सावरखेडा येथील फार्महाऊसचे उद्धाटन देखील करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री या ठिकाणी थोडी विश्रांती घेऊन नांदेडकडे प्रयाण करणार आहेत.

एकंदरित मुख्यमंत्र्यांचा हिंगोली दौरा हा पुर्णपणे बांगर यांच्यासाठीच असल्याचे कार्यक्रमाच्या नियोजनावरून स्पष्ट होते. बांगर यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. कारण विधानसभा अध्यक्ष निवडीच्यावेळी बागंर यांनी शिवसेनेसोबत बसून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान केले होते. पण दुसऱ्या दिवशी म्हणजेच विश्वादर्शक ठरावाच्या दिवशी बांगर विधानभवनात चक्क एकनाथ शिंदेंसोबतच आले. त्यामुळे चोवीस तासात बांगर यांनी निर्णय कसा बदलला याबद्दल शंका उपस्थितीत केली जात होती.

बांगर यांच्या बंडखोरीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत नव्याने संघटना बांधू, मी लवकरच हिंगोलीत येईन, असा विश्वास दिला होता. तसेच बांगर यांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी देखील केली होती. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक समर्थक आमदरांना बळ देण्याचे धोरण ठेवत त्यांच्यासाठी दौरे सुरू केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT