Bjp Candidate Subhash Sabne
Bjp Candidate Subhash Sabne Sarkarnama
मराठवाडा

खतगांवकरांनी पक्ष सोडल्यानंतर चिखलीकरांची सारवासारव; तर साबणे टेन्शनमध्ये

जगदीश पानसरे

नांदेड ः भास्कर पाटील खतगावकरांनी भाजपला सोडचिठ्ठी देत ऐन देगलूर-बिलोलीच्या पोटनिवडणूकीत भाजपची गोची केली. चिखलीकरांवर एकाधिकारशाहीचा आरोप करत खतगांवकरांनी खळबळ उडवून दिली, तर आता या आरोपानंतर सारसारव करत चिखलीकरांनी खतगांवकरांच्याच एकनिष्ठतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. या सगळ्या वादात पुन्हा आमदार होण्याचे स्वप्न घेऊन शिवसेनेतून भाजपवासी झालेले सुभाष साबणे मात्र टेन्शनमध्ये आले आहेत.

चिखलीकर यांच्या पत्रकार परिषदेत साबणे यांच्या तोंडावरचा तणाव स्पष्टपणे जाणवत होता. देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणूकीसाठी येत्या ३० आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे. महाविकास आघाडीचे जितेश अंतापूरकर विरुद्ध भाजपचे सुभाष साबणे अशी थेट लढत होत आहे. जितेश अंतापूरकर यांच्यांसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी संपुर्ण शक्तीपणाला लावली आहे.

खतगांवकर यांना स्वगृही आणण्यात चव्हाण यांना आलेले यश ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरण्याची शक्यता आहे. तर ज्या खतगांवकरांच्या भरवशावर भाजप देगलूर-बिलोलीत पंढरपूर पोटनिवडुकीची पुनरावृत्ती करू पाहत होती, त्या प्रयत्नानांना खतगावकरांच्या राजीनाम्याने मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला दुसरा धक्का देण्याच्या तयारीत असलेली भाजप काहीशी बॅकफूटवर गेली आहे.

एकाधिकारशाहीचा आरोप झाल्यानंतर खासदार चिखलीकरांनी आज तातडीने पत्रकार परिषद घेऊन ते फेटाळून लावले. मतदान अवघ्या १२ दिवसांवर येऊन ठेपलेले असतांना खतगांवकरांवर खालच्या पातळीवरचे आरोप करणे महागात पडू शकते, याची जाणीव चिखलीकरांना आहे. म्हणूनच त्यांनी खतगांवकरांवर टीका करतांना सयंम तर बाळगलाच पण या राजीनाम्याची आणि त्या मागच्या कारणांची जास्त चर्चा होऊ नये याची काळजी घेत सारवासारव देखील केली.

चिखलीकरांची ही सारवासारव सुरू असतांनाच शेजारी बसलेल्या उमदेवार सुभाष साबणे यांचा चेहरा मात्र चांगलाच पडला होता. भाजपमध्ये प्रवेश करून पुन्हा आमदार होण्याच्या साबणे यांच्या प्रयत्नात खतगांवकरांनी जणू खडाच टाकला. त्यामुळे साबणे प्रचंड टेन्शनमध्ये असल्याचे दिसून आले. काॅंग्रेसच्या प्रचाराची धुरा अशोक चव्हाण हे एकहाती सांभाळत आहेत. आता त्यांच्या मदतीला भास्कर खतगांवकर देखील असतील, त्यामुळे काॅंग्रेसच्या गोटात सध्या आनंदाचे वातावरण आहे.

तर खतगांवकरांनी पक्ष सोडल्यानंतर देखील भाजप दुप्पट ताकदीने लढण्याच्या तयारीत आहेत. भाजपकडून अद्याप प्रचारात राज्याचा कुणी मोठा नेता मैदानात उतरलेला नाही. पण या आठवड्यात मात्र भाजपचे राज्य स्तरावरील नेते सक्रीय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात प्रचारामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतांना दिसतील. तुर्तास काॅंग्रेस महाविकास आघाडी जोमात आणि भाजप चिंतेत असेच काहीसे वातावरण आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT