औरंगाबाद : शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर शिंदे गटाने वेगळी चूल मांडली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले, तसे त्यांनी (Shivsena) शिवसेना, युवासेनेतून हकालपट्टी केलेल्या राज्यभरातील नेते, पदाधिकाऱ्यांनी नव्याने नियुक्ती करण्याचा सपाटा लावला आहे. औरंगाबादेत युवासेनेचे उपसचिव असलेले व नंतर उचलबांगडी केलेले राजेंद्र जंजाळ हे त्यापैकीच एक.
जंजाळ यांची शिंदे यांनी जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. मात्र जंजाळ यांचा उत्साह इतका की (Municipal Corporation) महापालिका निवडणुकीत आपण (Bjp)भाजपशी युती करणार असल्याचे त्यांनी जाहीर करून टाकले. मग शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनीही आम्ही स्वबळावर लढणार असे प्रत्युतर दिले.
या सगळ्या दावे-प्रति दाव्यांमध्ये ज्या भाजपशी युती करण्याचे सुतोवाच शिंदे गटाच्या नव्या जिल्हाप्रमुख जंजाळ यांनी केले, त्या भाजपच्या शहराध्यक्षांनी मात्र अद्याप अशी कुठलीच चर्चा स्थानिक पातळीवर झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे जंजाळ यांचा दावा म्हणजे वातावरण निर्मितीचाच एक भाग आहे की काय? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. कोरोना आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवरून महापालिकेची निवडणुक दोन वर्ष रखडली. आता निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील १४ महापालिकांना त्या दृष्टीने तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्या तरी यामध्ये औरंगाबाद महापालिकेचा समावेश नाही. त्यामुळे सध्या निवडणुकीची सध्या चर्चाच आहे.
जंजाळ यांनी केलेल्या दाव्यानंतर भाजपकडून महापालिका निवडणूकीच्या अनुषंगाने शिंदे गटासोबत कुठलीही बैठक अथवा चर्चा झालेली नसल्याचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी स्पष्ट केले. जंजाळ यांची शिदे गटाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.
२५ जूलै रोजी भाजपच्या कार्यालयात पत्रकार परिषद झाली, तेव्हा जंजाळ तिथे आले होते. भाजपतर्फे जंजाळ यांचा मित्रपक्ष म्हणून त्यांचा सत्कारही करण्यात आला. त्याचवेळी भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर आणि जंजाळ यांची पहिली भेट झाली.
ही केवळ सत्कारासाठीची भेट होती. यात महापालिकेच्या अनुषंगाने कुठलीही चर्चा झाली नाही. शिवसेनेसोबत आमची युती होती,आता शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे आमची त्यांच्यासोबत जाण्याची तयारी आहे. मात्र या संदर्भात प्रदेश कार्यालयातून निर्देश आल्यानंतरच पुढील भूमिका ठरवली जाईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.