Nanded Congress
Nanded Congress  Sarkarnama
मराठवाडा

Lok Sabha Election 2024 : निम्मी काँग्रेस चव्हाणांसोबत भाजपमध्ये; मग जिंकण्याचा दावा कशाच्या जोरावर ?

Laxmikant Mule

Nanded Political News: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, त्यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार अमरनाथ राजूरकर व इतर काही मोजक्या पदाधिकाऱ्यांनी भाजपत प्रवेश केला. जिथे अशोक चव्हाण जातील तिथे मी जाणार, अशी भूमिका घेत माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हेही पुन्हा भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील निम्मी काँग्रेस अशोक चव्हाण यांच्या सोबत जाणार असल्याची चर्चा आहे. (Lok Sabha Election 2024)

अशा नाजूक परिस्थितीतही काँग्रेसकडे लोकसभा लढवण्यासाठी चार प्रबळ दावेदार असल्याचा दावा पक्षाने पाठवलेल्या निरीक्षकांकडून केला जात आहे. एवढेच नाही तर नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येईल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे. वास्तविक गेल्या निवडणुकीत खुद्द अशोक चव्हाण यांच्यासारखा तगडा उमेदवार असतानाही काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता तर काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नाही. पक्षात पडलेली फूट अशा परिस्थितीत काँग्रेस विजयाचा दावा करत असल्याने काँग्रेसचा हा कॉन्फिडन्स आहे की, ओव्हर कॉन्फिडन्स, अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. काही अपवाद वगळता या जागेवर काँग्रेसने विजय संपादन केला असला तरी ती परिस्थिती आता नाही. काँग्रेसला विजय मिळून देणारा हुकमी एक्का आता भारतीय जनता पक्षाच्या हातात आहे. तसेच देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा कायम आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढत झाली होती. या लढतीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. यशपाल भिंगे यांनी तब्बल एक लाख साठ हजार मते घेतली होती. यावेळचे राजकीय चित्र वेगळे राहणार आहे. गेल्या वेळेचे प्रतिस्पर्धी उमेदवार भारतीय जनता पक्षात आहेत, तर यशपाल भिंगे यांनी 'बीआरएस'मध्ये प्रवेश केला आहे.

भारतीय जनता पक्षात अशोक चव्हाण यांनी प्रवेश केल्यानंतर शहरातील नांदेड शहर व जिल्ह्यातील मुस्लिम व दलित नगरसेवक, पदाधिकारी यांनी काँग्रेस सोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा घटक पक्ष झाला आहे. तसेच नांदेड लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या नांदेड दक्षिण व देगलूर या दोन विधानसभा मतदारसंघांतील आमदारांनी आपली भूमिका उघडपणे स्पष्ट केली नाही.

सध्या तरी आमदार मोहन आण्णा हंबर्डे, आमदार जितेश आंतापूरकर हे दोघे सध्या तरी काँग्रेसमध्ये आहेत. पक्षाला अजूनही आपल्या पारंपरिक मतांवर विश्वास आहे. तसेच राज्यातील तोडफोडीचे राजकारण, शिवसेना ठाकरे गटाची साथ, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी असलेली सहानुभूती व भारतीय जनता पक्षात असलेली गटबाजी यामुळे काँग्रेसला विजयाची संधी दिसून येत आहे.

नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपचे दोन आमदार, एक शिंदे गटाचा, काँग्रेसचे दोन आमदार आहेत, तर अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपत प्रवेश केला आहे. शिवाय नायगाव, देगलूर बिलोली मुखेड या भागात वर्चस्व असलेले माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे अशोक चव्हाण यांच्या सोबत राहणार आहेत. अशा बिकट परिस्थितीत काँग्रेसने नांदेडची जागा जिंकण्याचा दावा केला आहे. हा किती खरा ठरतो येणारा काळच ठरवेल.

(Edited By-Ganesh Thombare)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT