Nanded Congress News Sarkarnama
मराठवाडा

Congress News : डॅमेज कंट्रोलसाठी नेमले चार निरीक्षक, पण नांदेडात पोहोचले एकच

Laxmikant Mule

Nanded Political News :

काँग्रेस सोडून अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले. हा आपल्यासाठी खूप मोठा धक्का आहे. पण या धक्क्यातून सावरू व पक्ष बळकट करू, असा निर्धार नांदेड काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला. अशोक चव्हाण यांच्यानंतर जिल्ह्यात उरलेली काँग्रेस सावरण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चार निरीक्षक नेमूण जिल्ह्याचा आढावा घेण्यास सांगितले होते. परंतु चार पैकी छत्रपती संभाजीनगरचे शेख युनूस एकटेच नांदेडमध्ये आढावा घेण्यासाठी आले होते. इतर तीन निरीक्षक हे Congress च्या महाबळेश्वर येथील शिबाराला गेल्याचे सांगितले जाते.

त्यामुळे शेख युनूस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत आपण सगळे मिळून पुन्हा काँग्रेस बळकट करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या बैठकीला नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे राजकारण गेली चार दशके चव्हाण कुटुंबाभोवती फिरले आहे. नांदेडमध्ये काँग्रेसचे सर्वेसर्वा अशोक चव्हाण राहिल्याने ते म्हणतील ती पूर्व दिशा असायची. आता त्यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसच्या जिल्ह्यातील अस्तित्वावरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच मोठ्या प्रमाणात पक्ष फुटतो की काय? अशी भिती असल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तातडीने आज नांदेड जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी चार निरीक्षकांची निवड करत त्यांना पाठवण्याचा निर्णय घेतला. पण यापैकी संभाजीनगरचे शेख युनूसच आले होते. त्यांनी खचलेल्या काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे ज्या आमदार मोहन हंबर्डे, देगलूर-बिलोलीचे जितेश आंतापूरकर यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे.

त्यापैकी आमदार हंबर्डे या बैठकीला हजर होते. तर जितेश आंतापूरकर हे मुंबईत काँग्रेसचे राज्यसभा उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा उमेदवारी अर्ज करण्यासाठी हजर होते. त्यामुळे तुर्तास या दोघांच्या काँग्रेस सोडून जाण्याच्या चर्चा थांबल्या आहेत. काँग्रेसने अशोक चव्हाण यांच्या पक्ष सोडून गेल्याने झालेल्या आघातातून सावरण्यासाठी कंबर कसली आहे. शहरातील नवा मोंढा परिसरात असलेल्या जिल्हा काँग्रेस कार्यालयात पक्षाची पुढील दिशा ठरविण्यासाठी पक्षनिरीक्षांच्या उपस्थित बैठक पार पडली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार मोहन आण्णा हंबर्डे, माजी आमदार वसंतराव चव्हाण, हनुमंत पाटील बेटमोगरेकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, नांदेड महापालिकचे माजी महापौर अब्दुल सत्तार, मारोतराव कवळे यांच्यासह जिल्ह्यातील आजी-माजी पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. ही बैठक पक्ष निरीक्षक माजी आमदार इश्वरराव भोसीकर, युसूफ यांच्या उपस्थितीत पार पडली. काँग्रेसचा विचार पुढे नेऊन पक्षाला बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

नांदेड हा काँग्रेसचा गड राहिला आहे, काँग्रेचे विचार मानणारे मतदार ‌व नागरिकांची मोठी संख्या जिल्ह्यात आहे. हा काँग्रेचा गड कायम राहील, असा विश्वास पक्ष निरीक्षक शेख युसुफ यांनी व्यक्त केला. भाजपने राज्यसभेत नांदेडमधून दोन खासदार पाठविले आहेत. तसेच जिल्ह्यात विधानसभेत तीन व विधान परिषदेत एक असे चार आमदार आहेत. तसेच विद्यमान खासदार भारतीय जनता पक्षाचा आहे. राज्यात व केंद्रात त्यांचीच सत्ता आहे, अशा परिस्थितीतून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पक्ष बळकट करावा लागणार आहे.

edited by sachin fulpagare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT