Chhatrapati Sambhajinagar Congress News
Chhatrapati Sambhajinagar Congress News Sarkarnama
मराठवाडा

Congress News : काॅंग्रेसला महिला शहराध्यक्ष मिळेना..

सरकारनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या पाच महिन्यांपासून काॅंग्रेसचे (Congress) महिला शहराध्यक्षपद रिक्त आहे. दीड महिन्यापुर्वी गांधी भवन येथे राज्याच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी या पदासाठी मुलाखती घेतल्या होत्या. परंतु अद्याप शहराला महिला काॅंग्रेस अध्यक्ष मिळू शकलेल्या नाहीत.

कधीकाळी काॅंग्रेसची जिल्ह्यावर एकहाती सत्ता आणि पकड होती. परंतु कालांतराने राज्य आणि देशपातळीवरील नेत्यांचे दुर्लक्ष झाले आणि पक्षाची दयनीय अवस्था झाली. (Congress) कुठल्याही राजकीय पक्षासाठी त्यांची महिला विंग अत्यंत महत्वाची असते. (Bjp) भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांकडे महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने आहेत.

त्यामुळे या पक्षांची आंदोलने मोठी आणि लक्षवेधी होतात. या शिवाय पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत देखील त्यांना मानाचे स्थान दिले जाते. काॅंग्रेस पक्ष हा देशातील सर्वात जुना आणि सर्वाधिक सत्ता उपभोगलेला पक्ष आहे. शिवाय त्यांच्या पक्षाची धुरा देखील महिलांच्याच हातात कित्येक वर्ष राहिलेली आहे. स्व. इंदिरा गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी हा पक्ष मोठा करण्यात महत्वाची भूमिका बजावली.

औरंगाबाद काॅंग्रेसमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून अंजली वडजे यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा काही महिन्यांपुर्वी दिला होता. त्यानंतर नव्या शहराध्यक्ष निवडीसाठी दीड महिन्यापुर्वी मुलाखती घेण्यात आल्या होत्या. मुलाखतीसाठी अवघ्या २०-२५ महिला आल्याचे पाहून प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी पक्षातील या अवस्थेबद्दल नाराजी बोलून दाखवली होती.

आता मुलाखतीनंतर देखील शहराध्यक्ष निवडली जात नसल्याने पक्षातून नाराजीचा सूर उमटत आहे. भाजप विरोधात काॅंग्रेसने शहरात व जिल्ह्यात अनेक आंदोलने करत पक्षात उत्साह आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला महिलांची भक्कम साथ लाभावी यासाठी महिला शहराध्यक्ष पद लवकर भरावे, अशी मागणी केली जात आहे. रायपूर येथील काॅंग्रेसचे अधिवेशन संपल्यानंतर लगेच महिला शहराध्यक्ष पदावर नियुक्ती केली जाईल, असे शहराध्यक्ष युसूफ शेख यांनी सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT