Aurangabad Congress News
Aurangabad Congress News Sarkarnama
मराठवाडा

Congress News : जिल्हा काॅंग्रेसने मरगळ झटकली, आंदोलनात दिसली नेत्यांची ऐकी..

सरकारनामा ब्युरो

Aurangabad : कधी काळी जिल्ह्यावर एकहाती वर्चस्व असलेल्या काॅंग्रेसची (Congress) अवस्था गेल्या १०-१५ वर्षात जिल्ह्यात दयनीय झाली होती. ना खासदार, ना आमदार, जिल्हा परिषद, महापालिकेतही बोटावर मोजण्या इतकी संख्या. त्यातच मुंबई आणि दिल्लीती वरिष्ठांचे जिल्ह्याकडे होणारे दुर्लक्ष या सगळ्या पार्श्वभूमीवर काॅंग्रेस रसातळाला गेली होती. गांधी भवनातील कार्यक्रमांकडे देखील स्थानिक नेते, पदाधिकारी फिरकेनासे चित्र होते.

परंतु मागच्या अडीच वर्षात राज्यात महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सत्ता आली आणि काॅंग्रेसला खऱ्या अर्थाने अच्छे दिन आले. राज्य पातळीवरचे आणि मराठवाड्यातील नेते सरकारमध्ये मंत्री झाल्याने काही प्रमाणात का होईना स्थानिक पातळीवर कार्यक्रम, आंदोलने, वरच्या वर नेत्यांचे दौरे सुरू झाले. (Aurangabad) गांधी भवनात गर्दी वाढू लागली. सत्ता असतांना देखील काही दिवस स्थानिक नेत्यांमध्ये बेबनावाचे चित्र होते, मात्र वरिष्ठांनी कानपिचक्या दिल्यानंतर आता ते चित्र बदलले. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा आणि हाथ से हाथ जोडो अभियानाचा देखील चांगला परिणाम दिसू लागला आहे.

महिनाभरापुर्वी जिल्हा काॅंग्रेसच्या महिला अध्यक्षपदासाठी मुंबईतून आलेल्या महिला पदाधिकाऱ्याने गांधी भवनात मुलाखती घेतल्या. त्यावेळी बोटावर मोजण्या इतक्याच महिलांची उपस्थिती पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त करत संताप व्यक्त केला होता. जिल्ह्यातील काॅंग्रेसच्या या दुरावस्थेचे कथन त्यांनी प्रदेश कमिटी आणि दिल्लीतील नेत्यांच्याही कानावर घातल्याची चर्चा होती. त्यानंतर स्थानिक पातळीवर जिल्हाध्यक्ष, डाॅ. कल्याण काळे, शहराध्यक्ष युसूफ लिडर, माजी मंत्री अनिल पटेल, नामदेव पवार व इतर पदाधिकारी एकदिलाने काम करतांना दिसून येत आहे.

केंद्र सरकार आणि उद्योगपती गौतम अदाणीच्या विरोधात काॅंग्रेसने काल केलेले आंदोलन लक्षवेधी ठरले. यावेळी कार्यकर्त्यांची उपस्थिती देखील बऱ्यापैकी होती. सध्या राज्य पातळीवर पक्षातील अतंरर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी प्रदेशाध्यक्ष व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यातील बेबनाव देखील समोर आला आहे. एवढेच काय तर, लातूर जिल्ह्यातील औसा येथे झालेल्या एका कार्यक्रमात माजी मंत्री अमित देशमुख यांनी देखील अंतर्गत गटबाजीच्या मुद्यावरून स्थानिक पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केल्याचे समोर आले.

एकंदरित राज्य किंवा शेजारच्या जिल्ह्यात जरी काॅंग्रेसमधील गटबाजी समोर येत असली तरी औरंगाबाद जिल्ह्यातील काॅंग्रेसने मरगळ झटकल्याचे उत्साहवर्धक चित्र पहायला मिळत आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमुळे कदाचित हे असू शकेल. परंतु त्यामुळे काॅंग्रेसचे जिल्ह्यात अस्तित्व आहे हे जाणवू लागले आहे. आता हा उत्साह विधानसभा, लोकसभा निवडणुकांपर्यंत टिकतो का? यावरच पुढे यश-अपयश अवलंबून राहणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT