Manoj Jarange Patil In Antarwali Sarkarnama
मराठवाडा

Latur Political News : जयंत पाटलांचा हात धरून आरक्षणाचा जाब विचारला, आता उमेदवारीसाठी जरांगेंची भेट..

Jagdish Pansare

सुधाकर दहिफळे

Latur Political News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांच्या शिवस्वराज्य यात्रेत घुसून मराठा आरक्षणाबद्दल जाब विचारत चर्चेत आलेले निवाडा येथील तरुण कार्यकर्ते नंदकिशोर सांळुके थेट मनोज जरांगे यांना भेटले. या भेटीत त्यांनी लातूर ग्रामीण मधून विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली. साळुंके आज गुरुवारी (ता. 22) आपल्या समर्थकांसह मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवालीत आले होते.

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीची मागणी करत त्यांनी आपला प्रस्ताव त्यांच्याकडे दिला आहे. (Latur) माजी मंत्री जयंत पाटील 15 ऑगस्ट रोजी लातूर येथे शिवस्वराज्य यात्रेसाठी आले होते. यावेळी त्यांचा ताफा अडवत साळुंके यांनी थेट पाटील यांचा हात धरून मराठा आरक्षणासंदर्भात आपली काय भूमिका आहे, हे स्पष्ट करा, अशी मागणी केली होती. यामुळे शिवस्वराज्य यात्रेत काहीकाळ गोंधळ उडाला होता.

मराठा आरक्षणाची मागणी करत जोरदार घोषणाबाजी झाल्यानंतर अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत साळुंके यांना बाजूला नेत जयंत पाटील यांना मार्ग मोकला करून दिला होता. दरम्यान या गोंधळ व घोषणाबाजीचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्यामुळे साळुंके चर्चेत आले होते. त्यानंतर आठवडाभरातच सांळुके आपल्या शिष्टमंडळासह आज अंतरवाली सराटीत आले होते.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केलेल्या आवाहनानूसार लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातून सांळुके यांनी त्यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली. यावेळी रितसर अर्ज देत साळुंके यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्याची माहिती जरांगे यांना दिली. लढायचे की पाडायचे? हे ठरवण्यासाठीची बैठक जरांगे पाटील यांनी पुढे ढकलली आहे. त्यामुळे सांळुके यांना उमेदवारी मिळणार का? हे पाहण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या लातूर दौऱ्यात संतोष नागरगोजे यांची लातूर ग्रामीण मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली होती. अधिकृत उमेदवार जाहीर झाल्यानंतरही मनसेचे शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत शिंदे यांनीही जरांगे पाटील यांची भेट घेत लातूर ग्रामीण मधुन उमेदवारीची मागणी केली आहे. ते डिगोळ देशमुख (ता.रेणापूर) येथील रहिवाशी आहेत. मनसेने अधिकृत उमेदवार दिला असतांना शिंदे यांनी जरांगे यांच्याकडे उमेदवारीची मागितल्याने मनसेत बंडखोरीची चर्चा सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT