Mp Imtiaz Jalil-Minister Atul Save-Ambadas Danve News
Mp Imtiaz Jalil-Minister Atul Save-Ambadas Danve News Sarkarnama
मराठवाडा

कराडांना यायला उशीर, दानवे-इम्तियाज म्हणाले, सावे साहेब तुम्हीच ध्वजारोहण करा..

Sunil Ingale

औरंगाबाद : सकाळी नऊ वाजून ४५ मिनिटाला केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते शंभर फूट स्मारक ध्वजाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र दहा वाजले तरीही डॉ. कराड (Dr.Bhagwat Karad) हे कार्यक्रमाला उपस्थित झाले नव्हते. यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेता अंबादास दानवे व (Imtiaz Jalil) खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना ध्वजाचा अवमान होऊ देऊ नका, वेळेत ध्वजारोहण करावे अशी विनंती केली.

तितक्यात कॅबिनेट मंत्री अतुल सावे आले असता इम्तियाज जलील आणि अंबादास दानवे यांनी अतुल साहेब तुम्ही ध्वजारोहण करा, असे म्हणत आग्रह धरला. (Aurangabad) पण केंद्रीय मंत्री कराड यांच्याऐवजी आपण धव्जारोहण करणे संयुक्तिक होणार नाही, हे लक्षात आल्यावर सावेंनी नम्रपणे नकार देत वाट पाहणे पसंत केले. त्यामुळे इम्तियाज आणि दानवे यांचा राजकीय कुरघोडीचा प्रयत्न फसला.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्‍या संकल्पनेतून शासकीय कला व ज्ञान महाविद्यालय शेजारी, किलेअर्क येथे सिटी सेंटर ठिकाणी शनिवारी (ता.१३) शंभर फूट स्मारक ध्वजाचा लोकार्पण सोहळा पार पडला. सकाळी नऊ वाजून ४५ मिनिटांनी कार्यक्रमाची वेळ देण्यात आली होती. यानुसार सर्व तयारी पूर्ण झाली होती. केवळ राजकीय नेत्यांची वाट पाहत सर्व अधिकारी मंडळी उभे होते.

कार्यक्रमाला वेळेत पोहोचलेले अंबादास दानवे व खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना वेळेत लोकार्पण करावे असे सांगत घड्याळ दाखवले. यावर थोडे थांबा मंत्री साहेब येतील त्यांच्या हस्ते करू अशी विनंती सावे यांनी केली. परंतु इम्तियाज यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले, की सावेंच्या हस्ते लोकार्पण करा अन्यथा मी जाऊन करतो. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते.

दुसरीकडे अतुल सावे यांच्या हाताला धरून जिल्हाधिकारी स्मारक ध्वजाकडे निघाले. कराड प्रमुख पाहुणे असतांना आपण ध्वजारोहण कसे करावे, या विचाराने सावे यांची पुरती कोंडी झाली असताना तिथे आमदार प्रशांत बंब आले. यावेळी बंब यांनी अतुल सावेंना कानात सांगितले, साहेब तुम्ही हळूहळू चला तोपर्यंत डॉक्टर साहेब येतील. हे सांगताच पन्नास मीटरवर असलेले स्मारक ध्वजाकडे सावे यांनी मुंगीच्या पावलांनी चालण्यास सुरवात केली.

इकडे मात्र इम्तियाज जलील व अंबादास दानवे हे स्मारक ध्वजाच्या ठिकाणी जाऊन आधीच थांबले होते. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते स्मारक ध्वजाचे लोकार्पण होऊ नये यासाठी इम्तियाज व अंबादास दानवे हे प्रयत्न करत होते. परंतु तितक्यात १० वाजून ५ मिनिटांनी डॉ.कराड आले आणि त्यांनी ध्वजाला हात लावला. १० वाजून १७ मिनिटाला पोलिस पथकांच्या वतीने ध्वजाला मानवंदना दिली आणि हा सोहळा पार पडला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT