Gram panchayat Election, Beed District News
Gram panchayat Election, Beed District News Sarkarnama
मराठवाडा

Gram panchayat Election : बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत चक्क केजरीवालांचा दिल्ली पॅटर्न..

दत्ता देशमुख

Beed News : निवडणुक दिल्लीची असो की मग गल्ली, गावखेड्यातील ग्रामपंचायतीची प्रचाराचा धुराळा, मुद्दे मात्र मुलभूत पायाभूत सुविधांशी निगडीतच असतात. Beed देशाच्या राजकारणाचा परिणाम खाली गाव पातळीवर कसा होतो याचा अनुभव सध्या मराठवाड्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत देखील येवू लागला आहे.

भल्या भल्या सत्ताधाऱ्यांना पाणी पाजत सलग दुसऱ्यांदा दिल्लीची आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंजाबमध्ये सत्ता मिळवत संपुर्ण जगाचे लक्ष केंद्रीत करणाऱ्या अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आम आदमी पक्षाची क्रेज आता गावात देखील दिसू लागली आहे. बीड जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीच्या (gram panchayat Election) जाहीरमान्यात चक्क दिल्ली पॅटर्नची छाप असल्याचे दिसून आले आहे.

दहिफळ येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिल्लीप्रमाणाचे मोफत आरोग्य सुविधा, शिक्षण आणि रेशनचे आश्वासन देण्यात आले आहे. या अनोख्या जाहीरनाम्याची चर्चा सध्या जिल्हाभरात सुरू आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा खासगी दवाखान्यांतही मोफत उपचार, मोफत शिक्षण हा पॅटर्न केज तालुक्यातील दहिफळ (वडमाऊली) गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून आला.

सरपंचपदाच्या उच्चशिक्षीत उमेदवार डॉ. अनिता शशिकांत दहिफळकर-गदळे यांच्या जाहीरानाम्यात १२ आश्वासने देण्यात आली आहेत. यात खासगी दवाखान्यांत दहिफळ ग्रामस्थांना मोफत उपचारासह अगदी रेशनही मोफत मिळेल, असे नमूद करण्यात आले आहे. केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली हे पाच हजार लोकसंख्या व २७०० मतदार संख्येचे गाव. अगदी मुरमाड व केवळ मोसमी पावसावर शेती असलेल्या गावाने ऊसतोडणी, शेती करुन मुलं शिकवली.

आज गावातील शेकडो शिक्षक, डॉक्टर, अभियंते व विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यात दहिफळ ग्रामपंचायतीचाही समावेश आहे. निवडणुकीत माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय ठोंबरे, राहूल गदळे व शरद गदळे यांनी एकत्र येऊन वडमाऊली परिवर्तन आघाडी नावाने पॅनल मैदानात उतरवले आहे. यात सरपंचपदासाठी डॉक्टर असलेल्या अनिता दहिफळकर-गदळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

त्यांच्या आघाडीने प्रसिद्ध केलेला जाहीरनामा जणू अरविंद केजरीवाल यांचाच पॅटर्न असल्याचे दिसते. दिल्लीच्या निवडणुकीत केजरीवाल यांनी ३०० युनिटपर्यंत मोफत वीज, सर्वच खासगी दवाखान्यांत मोफत उपचार, मोफत उच्च दर्जाचे शिक्षण, महिलांना भत्ता अशा घोषणा केल्या. दिल्ली व पंजाबमध्ये सरकार आल्यानंतर या घोषणांची अंमलबजावणी करुन दाखवली.

मोफत फॉर्म्युल्यावर टिका होत असली तरी या पॅटर्नने सगळ्यांनाच भुरळ घातल्याचे यावरून दिसून आले आहे. दहिफळ ग्रामपंचायत निवडणुकीतही १२ आश्वसनांत खासगी दवाखान्यांत मोफत उपचार व मोफत रेशनचे आश्वासन देण्यात आले आहे. आता ग्रामस्थांना हा दिल्ली पॅटर्न किती भावतो ते निकालनंतरच स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT