Latur District Bank Election Sarkarnama
मराठवाडा

लातूर जिल्हा बॅंकेवर देशमुखांचे वर्चस्व कायम; टाॅसवर भाजपनेही एक जागा जिंकली

(This year, however, the tradition of unopposed board of directors was broken by the BJP and other opposition parties.)काँग्रेसच्या सहकार पॅनलचे आठ उमेदवार विजयी झाले. तर भाजपचा एक उमेदवारही विजयी झाला.

सरकारनामा ब्युरो

लातूर ः जिल्हा बॅंकेची निवडणूक कधी नव्हे ती यावेळी चांगलीच चर्चेत आली. गेली अनेक वर्ष बिनविरोध संचालक मंडळ निवडून येण्याची परंपरा यंदा मात्र भाजपसह इतर विरोधकांमुळे खंडीत झाली. विरोधकांचे उमेदवारी अर्ज बाद करण्यावरून उठलेले वादंग, न्यायालयीन लढाई आणि थेट राज्यपालांपर्यंत हा विषय गेला. अखेर भाजपसह विरोधकांचे नऊ उमेदवारी अर्ज वैध ठरले आणि १९ पैकी ९ जागांसाठी मतदान पार पडले.

काॅंग्रेस प्रणित सहकार विकास पॅनलेने आधीच दहा जागा बिनविरोध निवडून आणत बॅंकेवर आपला दावा कायम ठेवला. मतदानानंतर ९ पैकी आठ जागाही याच पॅनलेने जिंकल्या. पण एका जागेवर दोन्ही पॅनलच्या उमेदवाराला समान पदे पडली. टाॅस करण्याचे मान्य झाले आणि टाॅसवर भाजपच्या उमेदवाराने विजय मिळवत जिल्हा बॅंकेत देखील एन्ट्री मिळवली.

पालकमंत्री अमित देशमुख, जिल्हा सहकारी बॅंकेचे सर्वेसर्वा आणि ज्यांनी आता बॅंकेची सुत्रे आमदार पुतणे धीरज देशमुख यांच्याकडे सोपवली ते दिलीप देशमुख यांच्या नियोजनबद्ध यंत्रणेमुळे जिल्हा बॅंक देशमुख कुटुंबाने राखली असेच म्हणावे लागेल. भाजपने पहिल्यांदाच या निवडणूकीत संपुर्ण पॅनल उभे करत काॅंग्रेसला आव्हान देण्याचा प्रयत्न केला.

पण उमेदवारी अर्ज बाद झाल्याने त्यांच्या या आव्हानाला सहकार क्षेत्रात मुरलेल्या दिलीप देशमुखांनी सुरूवातीलाच धक्का दिला. पण हे प्रकरण पुढे न्यायालयात गेल्याने काॅंग्रेसला एक पाऊल मागे घ्यावे लागले. निवडणूक झाली तरी भाजपला बॅंकेत प्रवेश मिळू द्यायचा नाही, याची संपुर्ण फिल्डींग देशमुख अॅन्ड कंपनीने केली होती. पण समान मते आणि टाॅसमुळे त्यांचा हा प्रयत्न फसला.

असे असले तरी भाजपच्या एका संचालकाच्या विरोधाला सत्ताधारी किती जुमानतील हा खरा प्रश्न भविष्यात असणार आहे. भाजपचे माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड, अरविंद निलंगेकर यांनी जंगजंग पछाडून काॅंग्रेसला नऊ जागांसाठी का होईना, निवडणूक घ्यायला भाग पाडले. परंतु दिलीप देशमुख, अमित, धीरज या काका-पुतण्यांनी भाजपला रोखलेच.

१९ जागांसाठी हाेणा-या निवडणूकीत नऊ जागांसाठी निवडणूक पार पडली. आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीची मतमोजणी झाली. यामध्ये काँग्रेसच्या सहकार पॅनलचे आठ उमेदवार विजयी झाले. तर भाजपचा एक उमेदवारही विजयी झाला. काँग्रेसच्या सहकार पॅनलचे गोविंद बिराजदार भोपणीकर आणि भाजपाच्या लोकशाही पॅनलचे भगवानराव पाटील तळेगांवकर यांच्यात समान मते पडल्याने नाणेफेक घेण्यात आली. त्यात भाजपचे भगवानराव पाटील तळेगांवकर हे विजयी झाले.

अन्य आठ जागांवर काँग्रेसचे सर्व उमेदवार निवडून आले आहेत. यामध्ये शिरूर अनंतपाळ विविध कार्यकारी सोसायटी गटातून व्यंकटराव पाटील, मजूर सहकारी संस्था गटातून दिलीप मलशेट्टी पाटील नागराळकर, इतर मागासवर्गीय गटातून अनुप ज्ञानोबा शेळके, महिला गटातून अनिता प्रभाकर केंद्रे आणि स्वयंप्रभा धनंजय पाटील, नागरी सहकारी बँक आणि पतसंस्था गटातून अशोक वसंतराव गोविंदपूरकर, अनुसूचित जाती आणि जमाती गटातून पृथ्वीराज हरिश्चंद्र शिरसाट, भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्गीय गटातून सपना पांडुरंग किसवे हे निवडून आले आहेत. या सर्वांच्या समर्थकांनी जल्लाेष केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT