Shivsena-BJP : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरपालिका निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी काल रात्री उशीरा छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले होते. विशेष म्हणजे या दोघांचाही मुक्काम एकाच पंचतारांकित हाॅटेलात होता. पण दोघांची ना भेट झाली, ना चर्चा! स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपमध्ये झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणानंतर फडणवीस-शिंदे यांच्यात काहीसा दुरावा आल्याचे चित्र होते.
मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्काराचे अस्त्र फेल गेल्यानंतर एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) थेट दिल्ली गाठत अमित शहांच्या दरबारात आपले गाऱ्हाणे मांडले. पण तिथेही पदरी निराशाच आल्याने शिंदे-फडणवीस यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले होते. नगपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पैठण आणि बीडमध्ये सभांचे आयोजन करण्यात आले होते. एकाच दिवशी सात सभांचे नियोजन करण्यात आल्यामुळे पैठण, बीडमधील सभा सकाळीच आयोजित करण्यात आल्या होत्या.
तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही पैठणमध्येच सभा लावण्यात आली होती. त्यामुळे दोघेही रात्रीच छत्रपती संभाजीनगरमध्ये मुक्कामी आले होते. पंचतारांकित हाॅटेलात मुक्कामाला असताना या दोघांच्या भेटी व चर्चेचा काही योग आला नाही. दरम्यान, आज सकाळी शिवसेनेचे सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू यांच्या कार्यालयावर निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकल्याची माहिती येऊन धडकली.
माध्यमांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या संदर्भात छेडले. शिंदे यांनी या प्रकरणात काय व्हायची ती चौकशी होईल, यामध्ये एवढं सिरीयस घेण्यासारखं काही नाही, असे म्हणत हा विषय हलक्यात घेतला.
तर एकाच हाॅटेलात मुक्कामी असताना तुमची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली नाही का? या प्रश्नावर मी अगोदर आलो होतो मुख्यमंत्री नंतर आले. पैठणमध्ये दोघांच्याही सभा आहेत, आम्ही एकमेकांशी नेहमीच भेटत असतो, फोनवरही आमची चर्चा होत असते, असे म्हणत यावरून नवा वाद नको, याची काळजी घेतली.
तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शहाजी बापू यांच्या कार्यालयावर पडलेल्या छाप्या बद्दल माहिती नाही, पण कुणी सत्तेत आहे कुणी सत्तेत नाही यावरून रेड ठरत नसते. आमच्याही कार्यकर्त्यांच्या बाबतीत तक्रार आली तर चौकशी होते, अनेकवेळा माझी ही गाडी तपासण्यात आली. सत्ता- विरोधक अशा कुठल्या गोष्टी चौकशीसाठी नसतात, असे सांगत कारवाईवर अधिक बोलणे टाळले.
आम्ही दोघे भेटले नाही हे दिवसभरासाठी तुम्हाला खाद्य मिळाले, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना लगावला. मी रात्री उशिरा आलो आणि त्यांच्यापेक्षा लवकर निघालो. त्यांची सभा माझ्या एक तास नंतर आहे त्यामुळे भेट झाली नाही, आम्ही उद्या भेटू. दोघेही प्रचारात मग्न आहोत फोनवर आमचे दररोज बोलणे होते. मी लवकर जात असल्यामुळे भेट झाली नाही, अशी शिंदे यांचीच री फडणवीसांनीही ओढली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.