Chhatrapati Sambhajinagar News : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारला होता.त्यामुळे सरकारची मोठे डोकेदुखी वाढली होती.तसेच लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात या मराठा आंदोलनाचा मोठा फटका भाजपसह महायुतीला बसला होता.त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपनं अतिशय सावध भूमिका घेतली आहे. याचवेळी आता काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीसाठी मनोज जरांगे पाटील हे रविवारी (ता.10) आपली भूमिका जाहीर करणार आहे.यातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मराठवाड्यात नवा डाव टाकल्याची चर्चा आहे.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील आणि काही मराठा आंदोलकांची भेट घेतली आहे. ही भेट राजकीय नसून कौटुंबिक असल्याचा दावा फडणवीस यांनी भेटीनंतर केला आहे. पण आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपसह महायुतीला मराठवाड्यात जरांगे फॅक्टरचा फटका बसण्याची शक्यता आहे.त्याच पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचे बोलले जात आहे.
मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली असली तरी रविवारी (ता.10) आपण भूमिका जाहीर करू, अशी नवी घोषणा केली.जरांगे काय भूमिका घेणार, याविषयी उत्सुकता असतानाच शनिवारी (ता.9) मराठा आरक्षण याचिकाकर्ते पाटलांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली.ही भेट कौटुंबिक असल्याचा दावा फडणवीस यांनी भेटीनंतर केला.
मतदानाला काही दिवस शिल्लक असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट विनोद पाटलांची भेट घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तसेच मराठवाड्यात मराठा आरक्षणाविषयी असलेलं महायुती सरकारविषयीचं नकारात्मक वातावरण बदलण्यास मदत होण्याची शक्यता आहे.एकीकडे मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंनी सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं आहे.छत्रपती संभाजीनगरमध्ये विनोद पाटलांची घरी जाऊन घेतलेली भेट हा जरांगे पाटलांसाठी एकप्रकारे इशाराच असल्याचं बोललं जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, विनोद पाटील हे आमचे मित्र आहेत.मराठा समाजाला आरक्षण देताना पाटलांची विशेष मदत झाली. मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायचं, कसं टिकवायचं याबाबत त्यांच्याकडून आम्हांला मदत झाली. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाविषयीची याचिका असतानाही पाटलांनी आम्हांला मदत केली. त्याचमुळे त्यांची भेट घ्यायला आलो.ही राजकीय भेट नाही तर कौटुंबिक भेट आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून इच्छुक असलेल्या विनोद पाटलांना महायुतीतून तिकीट मिळालं नव्हतं. त्यावर फडणवीस म्हणाले, राजकारणात एक निवडणूक कुणाचं भविष्य ठरवत नाही. योग्यवेळी योग्य गोष्टी घडतात. विनोद पाटील यांच्यामध्ये नेतृत्व गुण आहेत.त्यांनी सातत्याने राजकीय पेक्षा सामाजिक भूमिका स्वीकारली,असंही त्यांनी सांगितलं.
मनोज जरांगे पाटलांच्या रविवारी भूमिका जाहीर करण्यावरही त्यांनी भाष्य केलं.फडणवीस म्हणाले, "त्यांनी भूमिका मांडल्यावर आमची भूमिका मांडू. आम्ही आमचं काम करतोय.मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले.आरक्षण दिलं आणि टिकवलं.आमचा दृष्टिकोन स्पष्ट असून संधी मिळाली तेव्हा मराठा समाजाच्या विकासासाठी प्रयत्न केला. त्यामुळे कुणी किती टीका केली, वाद केला तरी त्याकडे दुर्लक्ष करतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांवरही टीकेची झोड उठवली.ते म्हणाले,आमच्यासमोर जे लोक आहे, त्यांनी मराठा समाजासाठी काहीही केलं नाही. 40 वर्षे जे सत्तेत होते, त्यांनी कधीही मराठा आरक्षणाच्या विषयाला हात घातला नाही, कधीही प्रयत्न केला नाही. उलट मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही असं ते म्हणाले होते, असा टोलाही त्यांनी यावेळी महाविकास आघाडीतील काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांना लगावला.
संजय राऊत यांना आम्ही गांभीर्याने घेत नाही. गुंडांच्या टोळ्यांचे नाव त्यांच्याकडे नाही तर कोणाकडे सापडणार, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर टीका केली म्हणजे त्यांना समाजात विभाजन व्हावे असे वाटते का? त्यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे, हे पाहावे लागेल, असे फडणवीस यांनी नमूद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.