Beed News, 01 Jun : मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी त्यांच्या अंगरक्षकाचे बंदूक काढून माझ्या डोक्याला लावत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक आरोप करत समाधान खिंडकर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी देखील तात्काळ धनंजय देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला.
मात्र, आता धनंजय देशमुख यांच्या विरोधात जीवे मारण्याची दिलेली तक्रार खोटी निघाली आहे. तर समाधान खिंडकरच्या विरोधात देशमुखांनी दिलेली तक्रारही खोटी असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही तसंच प्रत्यक्षदर्शींचे जबाब तपासल्यानंतर यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
तर आता या संपूर्ण घटनेप्रकरणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे. दरम्यान, समाधान खिंडकर हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील साक्षीदार दादासाहेब खिंडकर यांचा भाऊ असून त्याने दादासाहेब खिंडकर यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाहून परतताना धनंजय देशमुख त्यांच्या सहकाऱ्यांसोबत एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले होते. यावेळी समाधान खिंडकर देखील तिथेच जेवण्यासाठी थांबला होता.
यावेळी समाधान खिंडकर आपल्या मित्राला मोबाईलमधील व्हिडीओ दाखवत असताना धनंजय देशमुख यांच्या अंगरक्षकाने मोबाईल हिसकावला आणि याबाबतचा जाब विचारला असता, धनंजय देशमुखांनी अंगरक्षकाची बंदूक थेट समाधानच्या डोक्याला लावली, या प्रकरणी देशमुख यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तर धनंजय देशमुख यांनीही समाधान खिंडकरसह त्याच्या साथीदारांविरोधात आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा क्रॉस गुन्हा दाखल केला. या दोघांनी एकमेकांविरोधात दिल्याल्या तक्रारींमुळे मोठी खळबळ उडाली होती. शिवाय हे प्रकरण संपूर्ण राज्यभरात चर्चेत आल्यानंतर पोलीस उपअधीक्षक व्यंकटराम यांनी स्वतः या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी हॉटेल परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. शिवाय धनंजय देशमुख, त्यांचा अंगरक्षक आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे जबाब नोंदवले.
यावेळी फिर्यादींनी आपापल्या तक्रारीत नमूद केलेली बंदूक रोखण्याची किंवा जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची कोणतीही घटना घडल्याचं आढळून आलं नाही. दोन्ही तक्रारदारांनी वैयक्तिक आणि जुन्या वादातून एकमेकांना अडकवण्यासाठी जाणून बुजून खोट्या तक्रारी दिल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी अधिकृत प्रेस नोट काढून दोन्ही बाजूंचे गुन्हे खोटे असल्याचे स्पष्ट केलं. मात्र, या यू-टर्नमुळे आता पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, एकीकडे बीड ग्रामीण पोलिसांनी खोट्या तक्रारी देऊन पोलीस प्रशासन आणि न्यायव्यवस्थेचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे पोलिसांच्या या भूमिकेनंतर आणि खोट्या गुन्ह्यांच्या दाव्यानंतर धनंजय देशमुख यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, या संपूर्ण घडलेल्या प्रकाराबाबत आपण राज्याच्या गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.