Mumbai News : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आता मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत.त्यातच भाजप आमदार सुरेश धस यांच्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून टीकेची धार दिवसेंदिवस आणखीच टोकदार होत चालली आहे.
यामुळे मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सरकारवरचा दबाव वाढतच चालला आहे. यातच आता गेले दीड पावणे दोन महिन्यांपासून सततचे होत असलेले गंभीर आरोप,राजीनाम्याची मागणी यावरुन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) मीडियासमोर भावूक झाल्याचे दिसून आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे उपस्थित होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेटही घेतली. या बैठकीनंतर त्यांना पुन्हा एकदा मीडियानं राजीनाम्याबाबत मंगळवारी (ता.28) प्रश्न विचारताच मुंडे हे काहीवेळ गहिवरले. यानंतर त्यांनी जे उत्तर दिले त्यामुळे सगळं वातावरणच शांत झालं.
धनंजय मुंडे म्हणाले,ज्यावेळी व्यक्तिगत तुमच्यावर कुठलेही खोटे आरोप होतात,थेट तुमच्यावर आणि तुम्हाला जर लहान मूल असेल आणि ती जर तिसरीला शाळेत जात असेल ना...तर त्या मुलीला तिच्या मैत्रिणी आणि मित्र काय म्हणत असतील याचा विचार करा असं त्यांनी उपस्थित मीडियाला म्हटलं.याचवेळी त्यांनी आपण राजीनामा या विषयावर काही उत्तर देणार नसल्याचंही स्पष्ट केलं.
संतोष देशमुखांची ज्यांनी हत्या केली, त्या आरोपींना फास्ट ट्रॅकवर केस चालवून फासावर चढवलं पाहिजे, ही मी भूमिका स्पष्ट केली आहे,आजही हीच भूमिका आहे. पण सध्या बातम्या पेरायच्या सुरु आहे. बीडशिवाय माध्यमांवर काहीच दुसरं सुरु नाही. माध्यमांचा मान-सन्मान बीडमध्ये कमी होत आहे. आपण काय खरं, काय खोटं याची तपासणी करायला हवी,अशी भूमिकाही धनंजय मुंडे यावेळी मांडली.
यावेळी धनंजय मुंडेंना विरोधकांकडून सातत्यानं होत असलेल्या राजीनाम्याच्या मागणीवर सवाल करण्यात आला.यावेळी त्यांनी राजीनाम्यासंदर्भात मी काही बोलणार नाही, असं स्पष्टपणे सांगितलं.अंजली दमानिया यांनी अजित पवारांची आज भेट घेतली.या भेटीदरम्यान, त्यांनी काही कागदपत्रं दिलेत. मात्र, यावर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उत्तर देतील.
तसेच दमानिया यांनी जे काही पुरावे दिले. त्याविषयी अधिक न बोलता त्यांनी आपल्या राजीनाम्याविषयीचा निर्णय हा सर्वस्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतली,असे धनंजय मुंडे यावेळी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी काही कागदपत्रे मला दिली असून ती मी बघितली आहेत.यात मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलंय की, ज्याप्रमाणे अंजली दमानिया तुम्हाला भेटल्या तशाच त्या मला देखील भेटल्या. त्यांनी मलाही काही कागदपत्रे दिली आहेत.
पण या प्रकरणी एसआयटी,सीआयडी आणि न्यायालयीन चौकशी अशा तीन प्रकारे चौकशा सुरू आहेत. त्या संदर्भात काय वस्तुस्थिती आहे हे तपासली पाहिजे आणि त्यानंतर याबाबत जो काही निर्णय घ्यायचा असेल,ते ठरवू, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.