Beed News: माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. त्यांची मंगळवारी(ता.15 सप्टेंबर) अचानक प्रकृती बिघडल्यानं त्यांना उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
परळी येथील शासकीय विशेष अतिथीगृहात धनंजय मुंडे यांचा मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे 'जनता दरबार' आयोजित करण्यात आला होता. मात्र,आमदार मुंडेंना जनता दरबार सुरू झाल्यानंतर अचानक त्रास सुरू झाला.
यानंतर धनंजय मुंडे यांना तात्काळ परळी अतिथी शेजारी असलेल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्यातरी डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करून पुढील उपचार सुरू केले आहेत. डॉक्टर सध्या त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत.
धनंजय मुंडे यांच्यावर यापूर्वी फेब्रुवारी 2025 मध्ये त्यांना चेहऱ्याच्या स्नायूंशी संबंधित 'बेल पाल्सी' नावाचा आजार झाला होता.ज्यामुळे त्यांच्या बोलण्यावर परिणाम झाला होता. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या शारीरिक तंदुरुस्ती व वजन कमी करण्याबाबत मिश्किल टिप्पणी केली होती.
राज्याचे माजी मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी "मागील दीड वर्षापासून जवळचे लोक भेटले की, एकच प्रश्न विचारायचे, 'भाऊ, तब्येत कशी आहे?' हा एकच प्रश्न ऐकून मी अक्षरशः कंटाळलो होतो. त्यामुळे आता स्वतःमध्ये बदल घडवण्याचा निर्धार केला. मी स्वतः नियमित जिम करत असून बऱ्यापैकी वजन कमी केल्याचं त्यांनी परळी येथे 1 ऑगस्ट रोजी आयोजित एका खासगी कार्यक्रमात म्हटलं होतं.
मुंडे यांनी काही काळ माझे सर्वच क्षेत्रात वजन कमी झाले होते; मात्र आता येणारा काळ आपलाच आहे. त्यामुळे पुढील काळात तंदुरुस्त अन् फिट राहणे आवश्यक आहे," असं सूचक विधान आमदार धनंजय मुंडे यांनी केले होते. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी याचकार्यक्रमात एक खंतही बोलून दाखवली होती. त्यांनी आम्ही दोघे बहीण-भाऊ मंत्री झालो, पण ते चित्र फार काळ टिकू शकले नाही. दुर्दैवाने एकाला घरी बसावे लागले. मात्र, पंकजा असो, मी असो किंवा आमचे असंख्य कार्यकर्ते असोत; पद आणि प्रतिष्ठेपेक्षा या भागातील जनतेशी असलेले आमचे रक्ताचे नाते अधिक महत्त्वाचे असल्याची भूमिकाही मुंडे यांनी मांडली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.