CM Devendra Fadnavis Dhananjay Munde  sarkarnama
मराठवाडा

Beed News: "राज्यात आधीच कमी वाद आहेत का? आणखी एक कशाला?" : फडणवीस सकारात्मक असलेल्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा सवाल

Mahayuti Government: धनंजय मुंडे म्हणाले की, महापुरुषांना जाती-जातींमध्ये विभागण्याचे काम थांबले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे संपूर्ण समाजाचे आहेत. त्यांच्या जयंती सर्व समाजाने एकत्र येऊन साजऱ्या करायला हव्यात.

सरकारनामा ब्यूरो

Beed-Parli News : "राज्यात आधीच कमी वाद सुरू आहेत का, जे आता उपवर्गीकरणाचा नवा मुद्दा आणला जात आहे?" असा थेट सवाल करत माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी राज्यातील सामाजिक वातावरणाबाबत चिंता व्यक्त केली. समाजात पेटवली जाणारी आग विझवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले.

परळी येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दोन्ही नेत्यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

उपस्थितांना संबोधित करताना धनंजय मुंडे म्हणाले की, महापुरुषांना जाती-जातींमध्ये विभागण्याचे काम थांबले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे संपूर्ण समाजाचे आहेत. त्यांच्या जयंती सर्व समाजाने एकत्र येऊन साजऱ्या करायला हव्यात.

याच भाषणात त्यांनी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर 'भारतरत्न' पुरस्कार देण्याची मागणी पुन्हा एकदा केली. सामाजिक न्याय मंत्री असताना यासंदर्भात सरकारकडे प्रस्ताव दिल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच युवकांना "श्रद्धा ठेवा, पण अंधश्रद्धा ठेवू नका," असे आवाहन करत अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांवर चालण्याचे आवाहनही त्यांनी केले.

फडणवीसांची काय आहे भूमिका?

दुसऱ्या बाजूला उपवर्गीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र सरकारने अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नसल्याचे त्यांनी विधानसभेत स्पष्ट केले आहे. न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल मंत्रिमंडळासमोर आला असून त्यावर हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीही स्थापन करण्यात आली आहे.

सर्व संबंधित घटकांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेतला जाईल. तेलंगणात काँग्रेस सरकारने कायदा केला असला तरी महाराष्ट्रात घाई न करता विचारपूर्वक निर्णय घेतला जाईल,. महाराष्ट्रात लोकांच्या मनातील सर्व शंका दूर करून, सर्वांना सोबत घेत हा निर्णय करण्याचा आमचा प्रयत्न आहे असे, फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT