Police and health officials investigate fake Health Department appointment letters in Dharashiv after a large-scale recruitment fraud targeting unemployed youth was exposed. Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv News : माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या जिल्ह्यात बोगस आरोग्य सेवक नियुक्तीपत्राचा पर्दाफाश; लाखोंचा व्यवहार करणारे रॅकेट उद्ध्वस्त

Dharashiv Recruitment Scam : धाराशिव जिल्ह्यात आरोग्य सेवक पदाच्या बोगस नियुक्ती पत्रांद्वारे 15 ते 17 लाखांची फसवणूक करणारे मोठे रॅकेट उघडकीस आले असून गुन्हा नोंदवण्याची तयारी सुरू आहे.

Jagdish Pansare

Health Department : आरोग्य विभागातील नोकर भरती घोटाळ्याचे प्रकार यापुर्वी राज्याच्या अनेक भागात उघडकीस आले आहेत. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना बोगस नियुक्ती पत्र देऊन फसवणूक करणारी आणखी एक टोळी धाराशिव जिल्ह्यात सापडली आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयाचे बनावट नियुक्ती पत्र, त्यावर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची स्कॅन केलेली सही असलेल्या नियुक्ती पत्राचे वाटप करून फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.

आरोग्य अधिकारी या संदर्भात पोलीसांत तक्रार करणार असून संबंधितावर गुन्हे नोंदवण्यात येणार आहेत. आरोग्य विभागातील आरोग्यसेवक (क) या पदाचे बोगस नियुक्ती आदेश देऊन बेरोजगारांची 15 ते 17 लाख रुपयांना फसवणूक करणारे एक मोठे रॅकेट धाराशीव जिल्ह्यात सक्रिय असल्याचे उघड झाले आहे. या बोगस आदेशांवर चक्क उपसंचालकांच्या पत्रावर धाराशिवच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची स्वाक्षरी स्कॅन करून लावण्यात आली आहे.

या रॅकेटने फसवणुकीसाठी कागदपत्रांचा बनाव रचला आहे. काही उमेदवारांना दिलेल्या आदेशावर 'उपसंचालक कार्यालय, धाराशिव' असा उल्लेख आहे. मात्र, वस्तुस्थिती अशी आहे की, धाराशिव येथे आरोग्य विभागाचे उपसंचालक कार्यालयच अस्तित्त्वात नाही. धाराशिवचा कारभार लातूर उपसंचालक कार्यालयातून चालतो. तसेच पुणे उपसंचालक कार्यालयाच्या नावे देण्यात आलेला आदेशही पूर्णपणे चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अद्याप कुठल्याही उमेदवाराने याबाबत कुठेही लेखी तक्रार दिलेली नाही. फसवणूक झालेले उमेदवार हे धाराशिव, यवतमाळ, पुणे, बुलढाणा, जालना आदी जिल्ह्यांतील असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्यसेवक पदासाठी एका उमेदवाराकडून 15 ते 17 लाख रुपये उकळण्यात आले आहेत. बनावट आदेश हाती पडल्यानंतर आणि नियुक्तीसाठी गेल्यावर आपली फसवणूक झाल्याचे उमेदवारांच्या लक्षात आले. आता हे फसवणूक झालेले तरुण पैसे घेणाऱ्या एजंटांचा शोध घेत आहेत.

दरम्यान, मी बनावट आदेश पाहिले आहेत. आमच्याकडे उपसंचालक कार्यालय नाही. तसेच माझी बनावट सही वापरली आहे, असे कोणतेही आदेश आम्ही दिलेले नाहीत. आता यासंदर्भात सीईओ यांच्याशी बोलून एफआयआर दाखल करणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांनी सांगीतले आहे.

बीडमध्ये घडला होता असाच प्रकार

याआधी बीडमध्ये अशाच प्रकारच्या भरती घोटाळा प्रकरणी गुन्हे दाखल झाले होते. तरीही हे रॅकेट कार्यरत असल्याचे या प्रकारामुळे समोर आले आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या आणि अस्तित्त्वात नसलेल्या कार्यालयांचे शिक्के वापरून सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या भविष्याशी सुरू असलेला हा खेळ मुख्य सूत्रधारांना बेड्या ठोकून रोखावा, अशी मागणी या निमित्ताने होऊ लागली आहे.

बोगस नियुक्ती आदेश दिल्यानंतर या उमेदवारांना मुंबईतच तीन महिने ट्रेनिंग घ्यावे लागेल, असे सांगण्यात येते. विशेष म्हणजे, ही ट्रेनिंग कोणत्याही शासकीय रुग्णालयाऐवजी खासगी अथवा ट्रस्टशी संलग्न असलेल्या रुग्णालयात दिले जात असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. फसवणुकीचा हा बनाव अधिक खरा वाटावा, यासाठी हा ट्रेनिंगचा घाट घातला जात असल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT