Dharashiv News : Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation : गुन्हे दाखल झालेल्या आंदोलकांना मोफत कायदेशीर मदत

अनुराधा धावडे

Dharashiv Latest News : राज्यभरात मराठा आरक्षण आंदोलनाची धग वाढली आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या अनेक जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी मनोज जरांगे पाटील हे सातत्याने करत आहेत. मात्र, सरकारने अद्याप त्याबाबत पाऊल उचललेले नाही. आता धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा विधिज्ञ मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यास आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांना मोफत कायदेशीर सेवा पुरवण्याचा निर्णय या विधिज्ञ मंडळाने घेतला आहे.

धाराशिव विधिज्ञ मंडळाने मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला यापूर्वीच पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर मंगळवारी विधिज्ञ मंडळाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे दुसऱ्यांदा उपोषण सुरू केले आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय ३० दिवसांत घेण्यात येईल, असे आश्वासन राज्य सरकारने दिल्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. त्यांनी स्वतःहून सरकारला आणखी दहा दिवस वाढवून दिले.

सरकारने दिलेल्या आश्वासनाला एक महिना पूर्ण झाल्यानंतर जरांगे पाटील यांनी १४ ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटी येथे जाहीर सभा घेतली. त्या सभेला लाखोंच्या संख्येने मराठा समाजातील नागरिक उपस्थित राहिले. पुढचे १० दिवस म्हणजे एकूण ४० दिवस संपले तरी सरकारने मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेतला नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरात साखळी उपोषण सुरू झाले आहे.

धाराशिव विधिज्ञ मंडळाची मंगळवारी (ता. ३१) बैठक झाली. विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. रवींद्र कदम अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या आंदोलकांना मोफत कायदेशीर साह्य पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती ॲड. नितीन भोसले यांनी दिली. यापूर्वी विविध कारणांवरून मराठा आरक्षण आंदोलकांवर ठिकठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.

आताही जिल्ह्यात आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले, तर संबंधित आंदोलकांना मोफत कायदेशीर मदत करण्यात येणार आहे. ॲड. शिरीष गिरवलकर यांनी हा ठराव मांडला. त्याला ॲड. प्रदीप टेळे अनुमोदन दिले. यापूर्वी मराठा आरक्षण आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले होते. त्यावेळीही जिल्हा विधिज्ञ मंडळाने मोफत कायदेशीर साह्य पुरवले होते. जिल्हा विधिज्ञ मंडळाच्या मंगळवारच्या बैठकीला पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT