Dharashiv Police Latest News : Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv Police Latest News : मराठा आंदोलकांची समंजस भूमिका; मात्र पोलिसांकडून दुकाने बंद

Maratha Reservation : जिल्हाधिकाऱ्यांचे संचारबंदीचे आदेश

अविनाश काळे

Dharashiv Political News : जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू केलेली असतानाही मराठा आरक्षण आंदोलकांनी समंजस भूमिका घेत व्यापारी महासंघाशी संवाद साधला आणि दुकाने उघडी ठेवण्यासाठी आमच्याकडून कोणत्याही प्रकारची अडचण नसल्याचे सांगितले. आमचे आंदोलन शांततेत, अहिंसक मार्गाने सुरू आहे आणि यापुढेही ते शांततेत सुरू राहील. त्यामुळे दुकाने सुरू ठेवावीत, असे आंदाेलकांनी स्पष्ट केले होते.

मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवावीत, अन्यथा ती आम्हाला बंद करावी लागतील, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. त्यामुळे व्यापाऱ्यांना दुकाने बंद करावी लागली. सामाजिक सलोख्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या उमरगा (जि. धाराशिव) शहरावर दिवाळीच्या तोंडावर हा प्रसंग ओढवला.

उमरगा येथील तुरोरीजवळ काही अनोळखी व्यक्तींनी सोमवारी (ता. ३०) रात्री कर्नाटक परिवहन महामंडळाची बस पेटवून दिली. उमरग्यासह ग्रामीण भागात आंदोलन शांततेत सुरू असताना बस पेटण्यात आली. त्यामुळे येडशीसह अन्य भागांतील रास्ता रोको आंदोलन आणि बीड येथील घटनांच्या पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून जिल्हाधिकारी डाॅ. सचिन ओम्बासे यांनी संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. त्यामुळे उमरग्यातील बाजारपेठ बंदबाबत मंगळवारी संभ्रमावस्था होती. (Maratha Reservation)

सकाळपासून बाजारपेठेतील बरीच दुकाने सुरू होती. सकल मराठा समाजाची बाजारपेठ बंदसाठी सहमती नव्हती. संयम व शांततेत सर्व व्यवहार सुरू असावेत, असे संकेत मिळाल्यामुळे व्यापारी महासंघाने बंदचा निर्णय घेतला नव्हता. परंतु पोलिस निरीक्षक डी. बी. पारेकर यांनी संचारबंदीमुळे दुकाने बंद ठेवावी लागतील, अशी भूमिका घेतली.

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रणधीर पवार, उपाध्यक्ष प्रदीप चालुक्य, सचिव शिवप्रसाद लड्डा, काऱ्याध्यक्ष नितीन होळे यांच्या उपस्थितीत पोलिस ठाण्यात बैठक झाली. त्यात जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाचे पालन करण्याचे ठरल्याने दुपारी बारानंतर दुकाने बंद करण्यात आली. (Dharashiv news) "सकल मराठा बांधव व व्यापारी बांधव आम्ही समन्वयातून काम करण्यास तयार आहोत. सध्या दिवाळी सणानिमित्त व्यापाऱ्यांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे. प्रशासनाने स्थानिक पातळीवरच्या निर्णयासाठी सहमती देण्याची गरज असल्याचे व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष नितीन होळे यांनी सांगितले.

सकल मराठा समाजाच्या वतीने २८ ऑक्टोबरपासून उमरग्यात शांततेत साखळी उपोषण सुरू आहे. याच ठिकाणी आण्णासाहेब पवार यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. याशिवाय कदेर, कोराळ, मुरूम, गुंजोटी येथेही उपोषण सुरू आहे. अत्यंत शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला बस पेटवल्याने गालबोट लागले, परंतु त्या घटनेशी सकल मराठा समाजाने संबंध नसल्याचे सांगितले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे आंदोलन सुरू असून, सर्वांनी संयमाने यात सहभागी व्हावे, शांततेत आंदोलन करावे, असे आवाहन सकल मराठा समाजाने केले आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन सुरू असताना राष्ट्रीय महामार्गावरील तुरोरी गावात सोमवारी (ता.३०) रात्री साडेआठच्या सुमारास कर्नाटक राज्य परिवहन मंडळाची बस अनोळखी व्यक्तींनी पेटवून दिली. बिदर जिल्ह्यातील भालकी येथून पुण्याकडे निघालेली ही बस (केए ३८ एफ - १२०१) तुरोरीजवळ काही जणांनी अडवली. चालक अनिलकुमार बिरादार व वाहक राजकुमार शिंदे यांच्यासह ३९ प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. त्यानंतर बसच्या काचा फोडण्यात आल्या, बसच्या टाकीतील डिझेल काढून ते बसवर टाकून बस पेटवून देण्यात आली. अर्ध्या तासाने पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

उमरगा पालिकेच्या अग्निशमन दलाने आग विझवली. हैदराबादहून उमरग्याकडे येणाऱ्या व सोलापूरहून हैदराबादला जाणाऱ्या बस आहे, त्या ठिकाणच्या आगारात थांबवण्याची सूचना पोलिसांनी दिली. त्यामुळे सोमवारी रात्री उमरगा बस स्थानकात प्रवाशांची तारांबळ उडाली. हैदराबादला जाण्यासाठी खासगी जीपसाठी प्रवाशांना प्रत्येकी सातशे रुपये मोजावे लागले. पोलिस निरीक्षक डी. बी. पारेकर, आगारप्रमुख प्रसाद कुलकर्णी यांच्या समन्वयातून रात्री बसच्या सुरक्षिततेसाठी नियोजन करण्यात आले.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT