Dharashiv Constituency Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv Vidhan Sabha Constituency : धाराशिवमध्ये घडामोडी वाढल्या, महायुती, महाविकास आघाडीचे नेते समोरासमोर

अय्यूब कादरी

लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव बाजूला सारून धाराशिव जिल्ह्यातील महायुतीचे नेते विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये उत्साहाचे भरते आले आहे. लोकसभेसारखीच लाट कायम राहील, असा अंदाज बांधून त्या लाटेवर स्वार होण्यासाठी अनेकांनी तयारी सुरू केली आहे.

लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सौ. अर्चनाताई पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला. अर्चनाताई या तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत. हा पराभव मागे सारून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर मतदारसंघात जय्यत तयारी सुरू केली आहे. धाराशिव जिल्ह्यात सध्या धाराशिवला शिवसेना ठाकरे गट, भूम परंड्यात शिवसेना शिंदे गट, तुळजापूर भाजप आणि उमरगा-लोहारा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. धाराशिव मतदारसंघातून पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचे पुतणे धनंजय सांवत हे इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. त्यापाठोपाठ भाजपनेही धाराशिव विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकला आहे.

जिल्ह्यातील चारही मतदारसंघांत इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भूम-पंरडा, धाराशिव आणि उमरगा मतदारसंघांवर शिवसेना शिंदे गटाचा दावा कायम राहील, याचा पुनरुच्चार पालकमंत्री डॉ. सावंत यांनी केला आहे. त्यामुळे महायुतीत वाद निर्माण होईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे, कारण धाराशिव मतदारसंघावर भाजपनेही दावा केला आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या उपस्थितीत बुधवारी धाराशिव येथे जिल्हास्तरीय अधिवेशन व विस्तारित कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी धाराशिव -कळंब मतदारसंघ भाजपला सोडावा, अशी मागणी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांनी केली. तसा ठरावही मंजूर करण्यात आला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी पालकमंत्री सावंत यांनी जिल्ह्यातील तिन्ही जागा शिवसेना लढवणार असल्याचे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे, महाविकास आघाडीची शिवस्वराज्य यात्रा बुधवारी जिल्ह्यात दाखल झाली होती. तुळजापूर मतदारसंघावर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून दावा केला जात आहे. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे मधुकरराव चव्हाण (Madhukarrao Chavan) यांचा या मतदारसंघातून पराभव झाला होता. त्या निवडणुकीत अशोक जगदाळे यांना 35 हजार मते मिळाली होती. त्यावेळी जगदाळे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली होती. आता जगदाळे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP) पक्षात आहेत. तुळजापूर मतदारसंघातून ते इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या सक्षणा सलगरही या मतदारसंघातून इच्छुक आहेत. यावरून सध्या पक्षात वाद सुरू आहेत. त्यामुळेच, बसून वाद मिटवा अन्यथा मलाच येथून निवडणूक लढवावी लागेल, असा टोला शिवस्वराज्य यात्रेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना लगावला होता.

राजकीय घडामोडींमुळे जिल्ह्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. शिवस्वराज्य यात्रेत खासदार सुप्रिया सुळे यांनी, भावाने प्रेमाने मागितले असते तर पक्ष काय, चिन्ह काय, सर्वच देऊन टाकले असते, असे म्हणत अजितदादा पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघांतून सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांच्याविरोधात सुनेत्राताई पवार यांना उमेदवारी देणे चूक होते, असे अजितदादांनी दोन दिवसांपूर्वीच म्हटले होते, हे विशेष. मला मते नाही दिली तर तुमच्या खात्यातून 1500 रुपये परत काढून घेऊन, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे अपक्ष आमदार रवी राणा यांनी काही दिवसांपूर्वीच दिला होता. सुप्रिया सुळे यांनी त्याचाही समाचार घेतला.

जागावाटपाच्या कारणावरून महायुती आणि महाविकास आघाडीचेही नेते येत्या काही दिवसांत आमनेसामने आल्याचे चित्र दिसण्याची शक्यता आहे. भाजपने उमरगा आणि धाराशिव मतदारसंघावर दावा केल्याने याची सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीतही असेच चित्र दिसत आहे. उमरगा मतदारसंघ काँग्रेसला (Congress) सोडावा, असा ठराव यापूर्वीच करण्यात आला आहे. तुळजापुरातही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. भूम-परंडा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राहुल मोटे हे प्रबळ दावेदार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचाही या मतदारसंघावर दावा आहे. या घडामोडींमुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT