Marathvada politics : अनेक नाट्यमय घडामोडी, आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर पुन्हा एकदा काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीच्या सहकार पॅनलने दणदणीत विजय मिळवला. 19 पैकी 15 जागांवर बाजी मारत सत्ता मिळवल्यानंतर आता अध्यक्षपदाच्या निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
गेल्यावेळी अध्यक्ष असलेले धीरज देशमुख यांच्याच गळ्यात दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. तर उपाध्यक्ष पदासाठी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे चुलत बंधू अविनाश उर्फ बाळासाहेब जाधव तसेच भाचे जावई हेमंत जाधव यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत महायुतीतून बाहेर पडत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेत, भाजपला धक्का दिला होता. एवढेच नाही तर औसा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनाही सहकार पॅनल मध्ये घेत त्यांच्या पत्नी शोभा पवार यांना बिनविरोध संचालक करत मोठी खेळी केली होती. त्यामुळे अध्यक्षपदी धीरज देशमुख यांची पुन्हा वर्णी लागण्याची शक्यता असताना उपाध्यक्ष पद मात्र बाबासाहेब पाटील यांच्या घरातील दोन संचालकांपैकी एकाच्या गळ्यात पडू शकते.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या सहकार पॅनलचा निवडणुकीत दणदणीत विजय झाला. त्यामुळे सहकार पॅनलप्रमुख व माजी आमदार धीरज देशमुख यांना पुन्हा एकदा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची संधी मिळणार आहे. आता उपाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. येत्या दोन आठवड्यात होणाऱ्या नवनिर्वाचित संचालकांच्या पहिल्या बैठकीत याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माजी मंत्री दिलीपराव देशमुख, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 'सहकार पॅनल' उतरले होते. दुसरीकडे आमदार संभाजी पाटील, आमदार बसवराज पाटील, आमदार संजय बनसोडे, आमदार रमेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली 'परिवर्तन पॅनल'ने आव्हान उभे केले होते. मात्र, या निवडणुकीत सहकार पॅनल बहुमताने विजयी झाले. १९ पैकी १५ जागा सहकार पॅनलला मिळाल्या.
गेली पाच वर्षे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा धीरज देशमुख यांनी सांभाळली आहे. आता पुन्हा जिल्हा बँकेचा कारभार अध्यक्ष म्हणून त्यांच्याचकडे सोपवण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. निवडणुकीत उतरलेल्या 'सहकार पॅनल'चे नेतृत्वही धीरज देशमुख यांनीच केले होते.
उपाध्यक्षपदासाठी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे चुलत बंधू अविनाश जाधव, बाबासाहेब पाटील यांचे जावई आणि भाचे असलेले हेमंत जाधव की धीरज देशमुख यांच्या जवळचे मानले जाणारे सर्जेराव मोरे यांना संधी मिळणार? याबाबत चर्चा सुरू आहे. या तीन नावांत सध्या हेमंत जाधव यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आतापर्यंत दिलीपराव देशमुख, नामदेव पाटील, रामचंद्र पाटील, श्रीपतराव काकडे, बाबासाहेब पाटील, शिला पाटील, सुभाष काळदाते, यशवंतराव पाटील, सूर्याजी शिंदे, विजयकुमार पाटील, सुभाष देशमुख, धीरज देशमुख यांनी अध्यक्षपद भूषवले आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोध आणि निवडणुकीत निवडून आलेल्या दोन्ही पॅनलमधील १९ पैकी १५ संचालक हे नवे आहेत. ते प्रथमच बँकेचे संचालक म्हणून कारभार पाहणार आहेत. 'सहकार पॅनल'मधील धीरज देशमुख, सर्जेराव मोरे, जयेश माने तर परिवर्तन पॅनलमधील भगवानराव पाटील यांनी याआधी संचालकपदाची जबाबदारी सांभाळली आहे.