Dr.Kadri- Owasi Sarkarnama
मराठवाडा

ओवेसींची पाठ फिरताच `एमआयएम`मध्ये फुटीची चर्चा

(Aimim Working President Dr.Gaffar Kadri) मी राष्ट्रवादीत जाणार अशा प्रकारची जी आॅडीओ क्लीप व्हायरल झाली आहे, त्यात तथ्य नाही. राष्ट्रवादीचे कुठलेही अस्तित्व शहरात व जिल्ह्यात नाही, त्यामुळे मी त्या पक्षात जाण्याचा प्रश्नच नाही.

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद ः एमआयएममधील अंतर्गत गटबाजी मोडून काढण्यासाठी असदुद्दीन ओवेसी यांनी खुल्ताबादच्या बैठकीत राज्यभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांना समज दिली होती. विशेषतः प्रदेश कार्याध्यक्ष डाॅ.गफ्फार कादरी, खासदार इम्तियाज जलील यांच्यातील संघर्षाला पुर्णविराम देण्याचा प्रयत्न होता. परंतु ओवेसी यांची पाठ फिरतच नाही तोच एमआयएममध्ये फुट पडणार, गफ्फार कादरी पक्ष सोडणार अशा चर्चांना उधाण आले आहे.

सोशल मिडियावर एक आॅडिओ क्लीप व्हायरल झाली आहे, यात दोन कार्यकर्ते आपापसात कादरी यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाबद्दल बोलतांना दिसत आहेत. ही क्लीप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यामुळे खरंच डाॅ. गफ्फार कादरी पक्ष सोडणार का? यावर चर्चा सुरू आहे.

या संदर्भात कादरी यांनी स्वतः एक व्हिडिओ व्हायरल करत हा खोडसाळपणा आणि मला बदनाम करण्याचा प्रयत्न असून आपण राष्ट्रवादीत जाणार अशा प्रकारच्या आॅडीओ क्लीपमध्ये तथ्थय नसल्याचे स्पष्ट केले आहे.

असदुद्दीन ओवेसी यांचा औरंगाबाद दौरा आणि खुल्ताबाद येथील राज्यभरातून आलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबतची बैठक चांगलीच यशस्वी झाली. ओवेसींना मिळालेला प्रतिसाद देखील अभूतपुर्व होता. कधी नव्हे ते महाराष्ट्रात एमआयएमला औरंगाबादमधून एकमेव खासदार दिल्लीत पाठण्याची संधी मिळाली. महापालिकेत देखील पक्षाने प्रमुख विरोधी पक्ष म्हणून मजबुतीने काम केले.

या सगळ्या जमेच्या बाजू असल्या तरी अंतर्गत गटबाजीचे ग्रहण देखील एमआयएमला लागल्याचे दिसून आले आहे. पक्षाचे खासदार व प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील व प्रदेश कार्याध्यक्ष डाॅ. गफ्फार कादरी यांच्याती शीतयुद्ध काही थांबायला तयार नाही. नुकत्याच झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात या दोघांनी एकमेकांवर जी काही आगपाखड केली त्यावरून या दोघांमधील संबंध किती ताणले गेलेले आहेत याची झलक दिसून आली होती.

परंतु आगामी महापालिका आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुका पाहता ही गटबाजी मोडून काढण्यासाठी स्वतः असदुद्दीन ओवेसी यांनी लक्ष घालून कादरी आणि इम्तियाज यांच्यात समेट घडवून आणली. परंतु ओवेसीची पाठ फिरताच पुन्हा गटबाजीने डोके वर काढले आहे. डाॅ. गप्फार कादरी हे पक्षात प्रचंड नाराज आहेत, त्यामुळे ते राष्ट्रवादीत जाणार असल्याची एक आॅडिओ क्लीप सध्या सोशल मिडियावर चांगलीच धुमाकूळ घालते आहे.

आपापसात चर्चा करणारे हे कार्यकर्ते कादरी यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेतल्याचे सांगत आहेत. एमआयएमचे काही नगरसेवक देखील त्यांच्या सोबत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा दावा देखील या क्लिपमध्ये करण्यात आला आहे. परंतु डाॅ. गप्फार कादरी यांनी हा दावा खोडून टाकला आहे. या क्लीप संदर्भात कादरी यांनी स्पष्टीकरण दिले असून, आपल्याला बदनाम करण्याचा हा डाव असल्याचे म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे अस्तित्व काय?

मी राष्ट्रवादीत जाणार अशा प्रकारची जी आॅडीओ क्लीप व्हायरल झाली आहे, त्यात तथ्य नाही. राष्ट्रवादीचे कुठलेही अस्तित्व शहरात व जिल्ह्यात नाही, त्यामुळे मी त्या पक्षात जाण्याचा प्रश्नच नाही. म्हणायला मी पण म्हणून शकतो की राष्ट्रवादीचे काही लोक आमच्या पक्षात येण्यासाठी रांगा लावून बसले आहेत. पण या गोष्टींमध्ये काहीही अर्थ नाही.

खोडसाळपणा आणि मला बदनाम करण्याचा हा प्रकार आहे. यावर खुलासा करणे देखील मी गरजेचे समजत नव्हतो, परंतु मोठ्या प्रमाणात ही क्लीप सोशल मिडियावर फिरवली जात आहे, यातून माझ्या समर्थकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, म्हणून मी हे स्पष्ट करत आहे, असेही कादरी यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT