Nanded Congress  Sarkarnama
मराठवाडा

Nanded Congress News : चुकीला माफी नाही, लोकसभेला विरोधात काम करणाऱ्या नगराध्यक्षासह दहा नगरसेवकांची हकालपट्टी

Jagdish Pansare

लक्ष्मीकांत मुळे

Nanded Congress Politics News : राज्यात आणि विशेषतः मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. मराठवाड्यात काँग्रेसने लोकसभेच्या लातूर, नांदेड आणि जालना या तीन जागा लढवल्या आणि जिंकल्या. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसचा स्ट्राईक रेट शंभर टक्के होता. लोकसभेच्या नांदेड मतदारसंघात काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांनी भाजप महायुतीच्या प्रताप पाटील चिखलीकर यांचा धुव्वा उडवला होता.

अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर जिल्ह्यातील निष्ठावंत काँग्रेसच्या मतदारांनी भरभरून मतदान केले आणि महायुतीला दणका दिला. (Congress) काँग्रेसला यश मिळाले असले तरी पक्षात राहून काही तालुक्यात पदाधिकाऱ्यांनी विरोधात काम केल्याचे स्पष्ट झाले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संभाजीनगर, जालना जिल्ह्यामध्ये पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत अनेक पदाधिकाऱ्यांना गेट आऊट म्हणत बाहेरचा रस्ता दाखवला होता.

लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या तीन महिन्यानंतर अर्धापूर तालुक्यातील नगराध्यक्षासह दहा नगरसेवकांवर पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दणका देत `चुकीला माफी नाही`, हा संदेश काँग्रेस नेत्यांनी देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा यानंतर जिल्ह्यात सुरू झाली आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या (Nanded) उमेदवाराचा प्रचार करून पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे अर्धापूर नगरपंचातीच्या नगराध्यक्षासह दहा नगरसेवकांची पक्षातून हाकलपट्टी करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम यांनी पत्रकरांना दिली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कारवाई करण्याचें अधिकार दिल्याने नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, उपनगराध्यक्ष यासमीन सुलतान, अब्दुल मुसबीर खतीब, शालीनी राजू शेटे, डॉ. पल्लवी विशाल लंगडे, सोनाजी सरोदे, वैशाली प्रवीण देशमुख,मिनाक्षी व्यंकटी राऊत, नामदेव सरोदे, सलीम कुरेशी, साहेरा बेगम, काजी सल्लाउद्दिन या नगरसेवकांची पक्षातुन हाकलपट्टी करण्यात आली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत पक्षाने आमच्यावर अविश्वास दाखवून कोणत्याही प्रकारची जबाबदारी दिली नव्हती. तसेच पक्षातून हाकलपट्टी करण्यापूर्वी आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधीही दिली नाही. त्यामुळे पक्षाने केलेली कारवाई अन्यायकारक आहे. ही एकतर्फी कारवाई असुन आम्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे दाद मागणार आहोत, असे गटनेत्या शालीनी शेटे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT