<div class="paragraphs"><p>Haribhau Bagde-Kalyan Kale</p></div>

Haribhau Bagde-Kalyan Kale

 

Sarkarnama

मराठवाडा

जिल्हा दूध संघ ः भाजपचे बिनविरोधसाठी प्रयत्न, तर काॅंग्रेसला हवी निवडणूक

प्रकाश बनकर

औरंगाबाद : जिल्हा सहकारी दुध संघांच्या १४ जागांसाठी होणाऱ्या निवडणूकीत हळुहळु रंगत येऊ लागली आहे. गेल्या निवडणूकी प्रमाणे ही निवडणूकही अर्ज मागे घेण्याच्या आधी बिनविरोध व्हावी यासाठी भाजपने (Bjp) प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र दुसरीकडे काँग्रेसला (Congress) ही निवडणूक व्हावी अशीच इच्छा असल्याचे समजते. यासाठी सर्व मतदारसंघातून उमेदवारही काॅंग्रेसने मैदानात उतरवले आहेत.

बिनविरोध निवडणुकीचा विषयच नाही, आम्ही महाविकास आघाडीसाठी प्रयत्न करू, ते सोबत आले तर ठीक नाहीतर काॅंग्रेस स्वतंत्र लढेल असेही माजी आमदार जिल्हाध्यक्ष डाॅ.कल्याण काळे यांनी स्पष्ट केले आहे. (Haribhau Bagde) जिल्हा दुध संघाच्या १४ जागांसाठी ९९ अर्ज आले होते. त्यापैकी ७४ अर्ज वैध तर २५ अर्ज अवैध ठरले. यात काही इच्छुकांनी अपील केली आहे. २२ जानेवारीला निवडणूक होणार आहे.

जिल्हा सहकारी बँकेनंतर जिल्हा दुध संघाची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. दुध संघाचा थेट शेतकऱ्यांशी संबंध येतो, त्यामुळे इथे सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि काॅंग्रेसने जोर लावला आहे. दुध संघाचे माजी अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे विरुध्द माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांची या निमित्ताने पुन्हा एकदा प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

जिल्हा बँकेत आमदार बागडे यांचा झालेला पराभव भाजप पदाधिकाऱ्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यामुळे या निवडणुकीत काही दगाफटका होऊ नये, याची खबरदारी भाजपकडून घेतली जात आहे. निवडणूक टाळून बिनविरोध संचालक मंडळासाठी भाजप आग्रही आहे, त्यामुळे उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते प्रयत्न सुरू राहणार आहेत. यासाठी लवकरच बैठक घेणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राधाकिसन पठाडे यांनी सांगितले.

दुध संघाची निवडणूक जाहिर झाल्यापासून केवळ भाजप आणि काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारीच यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहे. शिवसेनेच्या गोटातून मात्र फारशा हालचाली होतांना दिसत नाहीत. मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे हे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत आघाडीवर असणारे त्रिकुट दूध संघात मात्र शांत आहे. त्या तुलनेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.काळे पहिल्या दिवसापासून सक्रीय असून बारकाईने सर्व हालचालीवर लक्ष ठेवून आहेत.

अर्ज छाननीत काँग्रेसच्या काही इच्छुकांचे अर्ज बाद झाले आहेत, त्यामुळे काॅंग्रेस बॅकफुटवर आली असे बोलले जात असले तरी, आम्ही एका जागेवर दोनपेक्षा जास्त उमेदवार दिले आहेत. यात आम्ही महाविकास आघाडीतील पक्ष असून या निवडणूकीत महाविकास आघाडी म्हणून पॅनल दिल्यास त्याला आमचे पहिले प्राधान्य असणार आहे, असे काळे यांनी स्पष्ट केले. ते सोबत आले नाही, तर मग आम्ही स्वतंत्र पॅनल उभे करणार, असेही काळे यांनी सांगितले.

तर शेतकऱ्यांची दुध संघाचा थेट संबंध येतो, त्यामुळेही संस्था व्यवस्थित चालवी साठीच आमदार हरिभाऊ बागडे यांचे दुध संघात असणे महत्वाचे आहे. आतापर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखालीच दुध संघ व्यवस्थित चालत आलेला आहे. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांची ही संस्था सुरक्षित राहावी यासाठी आमचा प्रयत्न आहे. यासाठीच निवडणूकी बिनविरोध करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, लवकरच बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे पठाडे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT