Omarga Vidhansabha Constituency : सलग तीन टर्मपासून शिवसेनेचा उमेदवार विजयी होत असलेल्या उमरगा-लोहारा (जि. धाराशिव) मतदारसंघावर आता भाजपने दावा ठोकला आहे. आमदार ज्ञानराज चौगुले (Dnyanraj Chougule) यांच्याकडून भाजप कार्यकर्त्यांना दुजाभावाची वागणूक दिली जात आहे, असा आरोप भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत केला होता. त्यामुळे या मतदारसंघातील महायुतीची घडी विस्कळीत होते काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
उमरगा मतदारसंघ 2009 मध्ये आरक्षित झाला. त्यावेळेपासून शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले निवडून आले आहेत. त्यांनी तिन्हीवेळेस काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केला आहे. या तिन्ही निवडणुकींत भाजपने शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून काम केले, मात्र आमदार चौगुले यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दुजाभावाची वागणूक दिली, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांनी सांगितले. हा विधानसभा मतदारसंघ भाजपला सोडवून घ्यावा, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्याकडे करण्यात आली आहे, असेही चालुक्य यांनी स्पष्ट केले.
शिवसेना-भाजप युती झाली त्यावेळी खरेतर उमरगा विधानसभा मतदारसंघ (Omarga Vidhansabha Constituency) भाजपकडे होता. शिवसेनेकडून पुढे उमरग्याचे दोनवेळा आमदार आणि एकदा उस्मानाबादचे (धाराशिव) खासदार म्हणून विजयी झालेले प्रा. रवींद्र गायकवाड (Ravindra Gaikwad) 1990 ची निवडणूक भाजपच्या उमेदवारीवर, कमळ चिन्हावर लढले होते. त्यावेळी तिरंगी लढत झाल्यामुळे मतांची विभागणी झाली आणि त्यांचा पराभव झाला. त्या निवडणुकीत त्यांना जवळपास 25 हजार मते मिळाली होती. अन्य एक उमेदवार बलभीमराव पाटील यांना 25 हजार तर विजयी उमेदवार कै. खालकिमियाँ काझी यांना 35 हजार मते मिळाली होती. दुरंगी लढत झाली असती तर प्रा. गायकवाड विजयी झाले असते, असे शिवसेना कार्यकर्त्यांच्या त्यानंतर लक्षात आले होते.
त्यावेळी उमरगा मतदारसंघात भाजपची फारशी ताकद नव्हती, मात्र भाजपने आपल्या वाट्याला आलेली जागा सोडली नव्हती. हा मतदारसंघ शिवसेनेला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी निकराचे प्रयत्न केले. माजी मुख्यमंत्री कै. मनोहर जोशी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता. 1995 च्या निवडणुकीआधी बाळासाहेब ठाकरे यांची उमरगा येथे सभा झाली होती. त्या सभेला अलोट गर्दी झाली होती. या तालुक्यात शिवसेनेची मोठी ताकद आहे, हे त्यावरून बाळासाहेब ठाकरे आणि मनोहर जोशी (Manohar Joshi) यांच्या लक्षात आले होते. त्यांनी हा मतदारसंघ शिवसेनेला सोडवून घेतला आणि 1995 च्या निवडणुकीत प्रा. रवींद्र गायकवाड विजयी झाले होते.
2014 पासून केंद्रात भाजपची सत्ता आहे. केंद्रात, राज्यातही सत्ता असल्यामुळे धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यासह उमरगा - लोहारा तालुक्यांतही भाजपची शक्ती वाढली आहे. जिल्ह्यातील काही दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे माजी प्रदेश कार्याध्यक्ष, माजी राज्यमंत्री बसवराज पाटील (मुरुमकर) यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे साहजिकच या विधानसभा मतदारसंघात भाजपची शक्ती वाढली आहे. शक्ती वाढल्यामुळे आणि आमदार चौगुले यांच्यावर कार्यकर्ते नाराज असल्यामुळे भाजपने उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकला आहे. 2014 मध्ये भाजप, शिवसेना वेगळे लढले होते त्यावेळी या मतदारसंघातून निवडणूक लढवलेले कैलास शिंदे यांना 31500 मते मिळाली होती.
आता शिंदे गटात असलेले शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले हे तीन टर्मपासून आमदार आहेत. या काळात त्यांनी शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांची काळजी घेतली, असे भाजप जिल्हाध्यक्ष चालुक्य यांचे म्हणणे आहे. शिवाय, ताकद वाढल्याामुळे भाजपलाही संधी मिळावी, अशीही त्यांची भावना आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपकडे घ्यावा, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे करण्यात आली आहे. यावरून आगामी काळात महायुतीत तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.