Marathwada Politics News: मराठवाडा पदवीधरमधून निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित आमदार डाॅ. प्रतापसिंह पाटील यांनी तीनवेळा या मतदारसंघाचे आमदार राहिलेले महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा केलेला पराभव राजकीय वर्तृळात चर्चेचा विषय राहिला. पाटील यांनी 'सकाळ संवाद'मध्ये आपल्या उमेदवारी मिळवण्यापासून ते विजयापर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला. पहिल्यांदाच मैदानात असलेल्या पाटलांनी चव्हाण यांच्यासारख्या मातब्बर नेत्याला या निवडणुकीत मात दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, "ही निवडणूक आम्ही सहज जिंकणार याचा विश्वास मला होता. विद्यमान आमदार पक्ष सोडून तिकडे गेले तेव्हाच महाविकास आघाडी मराठवाडा पदवीधरची निवडणूक लढवणार हे ठरले होते. या संदर्भात आठ महिन्यापूर्वी मुंबईत शरद पवार साहेबांनी मला बोलावून घेतले होते. जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मला पदवीधरची निवडणूक तुम्हाला लढवायची असे सांगण्यात आले होते. मी राजेश टोपे यांनी लढावे आणि निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून मी जबाबदारी पार पाडावी, असे मी सूचवले होते. परंतु राजेश टोपे यांनी माझ्याच नावाचा आग्रह धरला आणि त्यावर शिक्कामोर्तब झाले".
पदवीधरांना रोजगार हा प्रमुख मुद्दा घेऊन आम्ही मतदारांसमोर गेलो. सहा वर्षात काय करणार याचे व्हिजन त्यांच्यासमोर ठेवले. त्यांना ते पटले आणि आज निकाल तुमच्या समोर आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून बारा दिवसांमध्ये आठ जिल्हे आणि ७६ तालुक्यात पोहचलो. विरोधकांवर टीका करायची नाही, आपण निवडून आल्यानंतर सहा वर्षात काय करणार? हे पटवून सांगायचे यावर फोकस केला. मतदारांना आमचे व्हिजन पटले आणि लोकशाहीवर निष्ठा ठेवत त्यांनी मतदान केले असे पाटील यांनी सांगितले.
निवडणूक लढवण्याचे ठरले तेव्हा या मतदारसंघाचा अभ्यास केला. सगळ्याच पक्षांनी आम्ही एवढी मतदार नोंदणी केली, तेवढी केली असे दावे केले. ती ग्राह्य धरली तरी तो आकडा प्रत्यक्षात जितके मतदार आहेत, त्यापेक्षा किती तरी लाखांच्यावर जाणारा होता. त्यामुळे हे दावे फोल असल्याचे लक्षात आले आणि मग थेट मतदारांशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतल्याचे प्रतापसिंह पाटील म्हणाले. विद्यमान आमदारांच्याविरोधातील नाराजी स्पष्टपणे जाणवत होती, आपल्याला काम करायला भरपूर वाव आहे हे लक्षात घेऊन मतदारांपर्यंत पोहचलो. नवा चेहरा म्हणून मला सगळ्यांचीच पसंती मिळाली, सत्ताधारी, विरोधक अशा सगळ्यांचीच मदत झाल्याचे पाटील यांनी सांगीतले.एखादा चांगल काम करणारा उमेदवार असेल तर त्यामध्ये पक्षीय राजकारण आणू नये, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.
शरद पवार यांचा निवडणूक लढवण्याचा निरोप मिळाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे यांच्यासह पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिलीप घुगे हेही निवडणुकीच्या मैदानात होते. त्यांची माघार व्हावी यासाठी प्रयत्न झाले; मात्र शेवटपर्यंत माघार झाली नाही. त्यामुळे मैत्रीपूर्ण लढत झाली. रविराज साबळे आणि दिलीप घुगे यांना मिळालेल्या मतांमुळे पहिल्या पसंतीच्या मतांवर विजय मिळवता आला नाही आणि दुसऱ्या पसंतीच्या मतांवर निकाल लागला. आणखी अडीच ते तीन हजार मते मिळाली असती, तर पहिल्या पसंतीतच विजय मिळाला असता, असे पाटील यांनी सांगितले
विरोधी उमेदवार टीका करायची नाही, हे पथ्य आम्ही पाळले. फक्त आपण निवडून आल्यावर काय करणार यावर फोकस केला, पदवीधर, तरुण-विद्यार्थ्यांना अपील केला. मोठा प्रतिसाद संपूर्ण मराठवाड्यात मिळाला. उत्साहात मला मतदान झाले, पण काही ठिकाणी अतिउत्साहाचा फटका बसला आणि बारा ते तेरा हजार मते बाद झाले. उदाहरणच द्यायचे झाले तर एका मतदाराने माझ्या नावासमोर पंसती क्रमांक एक टाकला, पण सतीश चव्हाण यांच्या नावासमोर थेट 'सतीश इट्स डन ब्रो'अशी चिठ्ठीच बॅलेट पेपरवर चिटकवली. त्यामुळे माझे एक मत बाद झाले. असे प्रकार अनेक ठिकाणी आढळून आल्याचे प्रतापसिंह पाटील यांनी सांगीतले.
मराठवाड्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. 80 दिवसांपासून पाऊस नाही, खरीपाचे पीक गेले, रब्बीचा हंगामही धोक्यात आला आहे. अलनिनोचे संकट येणार हे माहित असून सुद्धा राज्य सरकारने याचा कुठलाच अभ्यास केला नाही, असा थेट आरोप प्रताप पाटील यांनी केला. तो केला असता, सोयाबीन, मुगासह इतर पिकांची लागवड करू नका, असे आवाहन करून त्यांना त्यासाठी सरकारने एकरी पिकाच्या उत्पादन खर्चा एवढी मदत केली असती आणि त्याऐवजी कडब्याची लागवड करायला सांगितले असते तर आज चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला नसता अशी टीका पाटील यांनी सरकारवर केली.
आता पाणी नाही तर चारा आणणार कुठून हा मोठा प्रश्न आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस नाही, मग चारा नसेल तर पशूधन जगवायचे कसे? हा मोठा प्रश्न आहे. पुढच्या जूनमध्ये पाऊस येईल, असे गृहित धरले तरी अजून बराच अवधी आहे. शेतकऱ्यांनी आपल्या मुलांना शिक्षण कसे द्यायचे, पशुधन कसे जगवायचे? असा सवाल प्रताप पाटील यांनी केला. जर जूनमध्ये अपेक्षित असलेला पाऊस पडला नाही, तर परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. अशा परिस्थित अलनिनो संकटाचा सरकारने आधीच अभ्यास करून उपाय योजना करायला हव्या होत्या? असेही पाटील म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.