<div class="paragraphs"><p>Raosaheb Danve-Eknath Shinde</p></div>

Raosaheb Danve-Eknath Shinde

 

Sarkarnama

मराठवाडा

एकनाथ शिंदे सक्षम, त्यांना मुख्यमंत्री करा, दानवे पुन्हा बोलले

सरकारनामा ब्युरो

जालना ः राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या शस्त्रक्रिया झाल्यामुळे विश्रांती घेत आहे. नुकतेच झालेले हिवाळी अधिवेशन देखील त्यांच्याशिवाय पार पडले. या दरम्यान, भाजपच्या अनेक नेत्यांनी शिवसेनेला मुख्यमंत्री (Uddhav Thackeray) पदाचा पदभार इतर कुणाकडे तरी सोपवा असा सल्ला दिला होता. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी देखील असाच सल्ला काल औरंगाबादेत बोलतांना शिवसेनेला दिला होता. (Eknath Shinde) त्याचाच पुनरुच्चार दानवे यांनी आज जालना येथे पहिल्या किसान रेल व नांदेड-हडपसर या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतांना केला.

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे सक्षम नेतृत्व आहे, त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून देखील काम केलेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची प्रकृती बरी होत नाही, तोपर्यंत त्यांना मुख्यमंत्री करा, अशी मागणी दानवे यांनी पुन्हा प्रसार माध्यमांशी बोलतांना केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापासून भाजपच्या अनेक नेत्यांनी राज्याला मुख्यमंत्री नाही, मुख्यमंत्री आजारी असतील तर त्यांनी इतरांकडे पदभार सोपवावा, अशी मागणी आणि विधाने केली.

मुख्यमंत्री लवकर बरे व्हावेत, अशी सदिच्छा व्यक्त करतांनाच राज्याला वाऱ्यावर सोडता येणार नाही अस म्हणत फडणवीसांनी, तर तुमचा अजित पवारांवर विश्वास नसेल तर तुमच्या मुलाला आदित्यला पदभार द्या, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी अधिवेशना दरम्यान लगावला होता. आता केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील यात उडी घेतली आहे. शिवसेनेतील महत्वाचे खाते असलेले नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा, अशी मागणी दानवे यांनी नुकतीच केली होती.

आज जालन्यात या संदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी याचा पुनरुच्चार केला. दानवे यांच्या या मागणीनंतर एकनाथ शिंदे यांनी दानवे यांच्यावर ते आग लावण्याचे काम करत असल्याचा आरोप केला. या संदर्भात विचारले असता दानवे म्हणाले, मी कुठलाही आग लावण्याचा प्रयत्न केलेला नाही. मुख्यमंत्री आजारी आहेत, अशावेळी राज्याला वाऱ्यावर सोडता येणार नाही.

त्यामुळे शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाचा पदभार एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवावा, असे मत आपण व्यक्त केले होते. त्यावर मी आजही ठाम आहे, एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील सक्षम नेतृत्व आहे. उद्धव ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेत नेता कोण? तर एकनाथ शिंदे, त्यामुळे मी सहज बोललेलो नाही, त्यांनाच मुख्यमंत्री केलं पाहिजे, असेही दानवे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT