Cm Eknath Shinde News
Cm Eknath Shinde News Sarkarnama
मराठवाडा

Eknath Shinde News : मी अजितदादांना देशद्रोही म्हणालो नव्हतो, मलिकांचा देशद्रोह्यांशी संबंध, ते बोलणारच..

सरकारनामा ब्युरो

Vidhan Parishad : विधीमंडळ अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला चहापानावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बरे झाले देशद्रोह्यांबरोबर, महाराष्ट्र द्रोह्यांबद्दल चहापान टळले अशी टीका केली होती. यावर विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री मला देशद्रोही म्हणाले, असा आरोप करत त्यांच्यावर हक्कभंग आणण्याची मागणी केली होती.

यावर आज विधान परिषदेत सभापतींच्या परवानगीने मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाबद्दल खुलासा केला. एकनाथ शिंदे म्हणाले, मी त्या पत्रकार परिषदेत कुठेही अजितदादांना देशद्रोही म्हणालो नव्हतो. माझे वक्तव्य हे (Ajit Pawar) अजित पवार, अंबादास दानवे यांच्याबद्दल नव्हते. (Budget Sesstion) मी जे बोललो ते राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिक याच्याबद्दल होते. मलिक यांच्यावर एनआयए, ईडीकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

देशद्रोही दाऊद इब्राहिम, छोटा शकील, इकबाल मिर्ची, हसीना पारकर यांच्यांशी संबंध व आर्थिक व्यवहार केल्याचा मलिक यांच्यावर आरोप आहे. त्यानूसार मलिकांवर देखील देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला आहे. हसीना पारकर या दाऊद इब्राहीमच्या बहिणीसोबत मलिकांनी जमीन आणि गाळे खरेदी विक्रीचा व्यवहार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गोवावाला कंपाऊंडमधील काही गाळ्यांवर नवाब मलिक यांनी १९९५ मध्ये अवैध कब्जा केला होता.

त्यानंतर २००३ मध्ये हसिना पारकर सोबत मलिक यांची बैठक झाली आणि त्यांनी कब्जा घेतला. हसीना पारकरच्या ड्रायव्हर सरदार खान यांचा गाळाही नवाब मलिक यांनी घेतला, पारकरची जमीनही घेतली. २००५ मध्ये सरदार खानला बाॅम्बस्फोट प्रकरणात शिक्षा झाली. त्याच्याकडूनच मलिकांनी जमीन घेतली. यात लाखोंचा व्यवहार झाला. २३ फेब्रुवारी २०२२ रोजी मलिकांना अटक करण्यात आली. एनआयए, ईडीकडून कारवाई झाल्यानंतर मलिकांचा जामीन देखील फेटाळण्यात आला होता.

सुप्रीम कोर्टाने देखील त्यांचा जामीन फेटाळला. या प्रकरणात मलिक यांची १५ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली. याशिवाय त्यांच्यावर दहशतवादाला खतपाणी घालणे, शस्त्रास्त्र प्रकरण, मनी लाॅन्ड्रींगचे गुन्हे दाखल आहेत. देशद्रोह्यांसोबत व्यवहार करणाऱ्या नवाब मलिकांना मी देशद्रोही म्हणालो. त्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारबरोबर चहापान टळले अस मी म्हणालो होतो. पण मी अजित पवार, दानवेंना देशद्रोही म्हणालो, असा कांगावा केला गेला, असा दावा शिंदे यांनी आपल्या खुलाशात केला.

अजितदादांनी महाराष्ट्रद्रोह्यांबद्दल चहापान घेतले नाही, असे म्हटले. मग आम्ही काय महाराष्ट्रद्रोह केला? आम्ही काय द्रोह केला ? असा सवाल करत सुरूवात अजितदादांनी केली असेही शिंदे म्हणाले. नवाब मलिक देशद्रोही आहेत, मग त्यांना देशद्रोही म्हणायचे नाही का? दानवे तुमचे त्यांना समर्थन आहे का? महाविकास आघाडी सरकारमध्ये असतांना देखील आम्ही तेव्हा मुख्यमंत्र्यांना मलिकांचा राजीनामा घ्या म्हणून सांगितले होते.

संजय राठोडचा राजीनामा घेतला, पण नवाब मलिकचा घेतला नाही. म्हणून सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय आम्हाला घ्यावा लागला. अजितदादांना मी देशद्रोही म्हटलं नाही. याला राजकीय रंग देण्याची आवश्यकता नाही. बाॅम्बस्फोट घडणवाऱ्या दाऊदबरोबर संबंध असणारे देशद्रोहीच. याच आपण समर्थन करता का? मी खालच्या सभागृहातही विचारणार आहे. देशद्रोह्याला देशद्रोही म्हणणं हा गुन्हा असेल तर असा गुन्हा मी पन्नासवेळा करेन, असेही शिंदे यांनी सभागृहात ठणकावून सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT