Mla Shirshat-Minister Bhumre- Khaire News Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

असे का घडले ? भुमरेंच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, अन् शिरसाटांच्या आधी खैरेंचा सत्कार..

शिवसेना व नेतृत्वावर टीका करण्यात संजय शिरसाट व भुमरे आघाडीवर होते, इतर आमदारांनी मात्र फारशी टीका ठाकरे किंवा शिवसेनेवर केली नाही. ( Shivsena, Aurangabad)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : एकनाथ शिंदेंच्या बंडाला जिल्ह्याने मोठे बळ दिले. सहा पैकी पाच आमदार या बंडात सहभागी झाले, पैकी दोघांना नव्या सरकारमध्ये मंत्रीपदाची लाॅटरी लागली, तर एकाचा अपेक्षाभंग झाला. (Shivsena) ठाकरे सरकार गेले आणि शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. आता हे सरकार किती दिवस टिकणार? हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून असणार आहे.

परंतु राज्यात ठिकठिकाणी निष्ठावान विरुद्ध बंडखोर, गद्दार असा संघर्ष सुरू झाला आहे. बंडखोरी करणारे म्हणतात आम्ही उठाव केला, शिवसेना वाचवण्यासाठी केला, आम्हीच बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक. (Sanjay Shirsat) तर उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ असलेले आमदार पदाधिकारी बंडखोरांना गद्दार म्हणून डिवचत आहेत. (Chandrakant Khaire) याचे पडसाद आतापर्यंत आरोप-प्रत्यारोपापर्यंत मर्यादित होते, पण आता जाहीर कार्यक्रमात देखील ते उमटू लागले आहेत.

शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या संदीपान भुमरे यांच्या पैठणमधील कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या दिसल्या, तर पोलिस आयुक्तांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बोलावलेल्या समन्वय बैठकीत माझ्या आधी माजी खासदारांचा सत्कार का केला? म्हणत आमदार संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला. या दोन घटनांमुळे शिंदेसोबत गेलेल्या आमदारांचा संयम सुटत चालला आहे की काय? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

पैठण मतदारसंघातून पाचवेळा निवडून आलेले संदीपान भुमरे कार्यक्रमाला गर्दी जमली नाही म्हणून संतापले. तर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे पराभूत झाल्यानंतरही त्यांना माझ्या आधी मान कसा मिळतो? याचे दुःख संजय शिरसाटांना झाल्याचे पहायला मिळाले. बंडखोरीनंतर आपापल्या मतदारसंघात परतलेल्या शिरसाट, जैस्वाल, सत्तार, बोरनारे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. भुमरे मात्र या शर्यतीत थोडे मागे राहिले होते.

शिवसेना व नेतृत्वावर टीका करण्यात संजय शिरसाट व भुमरे आघाडीवर होते, इतर आमदारांनी मात्र फारशी टीका ठाकरे किंवा शिवसेनेवर केली नाही. कदाचित यामुळेच भुमरे आणि शिरसाट यांच्याबद्दल काहीसा अधिक रोष दिसतो. शिरसाट यांची मंत्रीमंडळात वर्णी निश्चित समजली जात असतांना त्यांची संधी हुकली. त्यामुळे ते कमालीचे नाराज आहेत, या नाराजीतूनच पोलिस आयुक्तांनी बोलावलेल्या बैठकीतील प्रकार घडला असावा.

शिवसेनेत संजय शिरसाट आणि खैरे गेली कित्येक वर्ष एकत्र काम करत होते. जिल्ह्यात आणि शहरात शिवसेना वाढवण्यात या दोघांचेही योगदान आहे. खैरे पक्षात ज्येष्ठ आहेत, शिवाय त्यांचा जिल्ह्यातील संपर्क देखील शिरसाट यांच्यापेक्षा दांडगा आहे. दोन टर्म आमदार, मंत्री आणि सलग चारवेळा खासदार राहिल्यामुळे प्रशासन आणि अधिकारी वर्गामध्ये अजूनही खैरेंना मानाचे स्थान आहे.

त्यामुळेच प्रोटोकाॅल विसरून शिरसाटांच्या आधी खैरेंचा सत्कार करण्यात आला. पण शिरसाटांच्या हे जिव्हारी लागले आणि त्यांनी कार्यक्रमातून निघून जाण्याचा प्रयत्न केला. यावर खैरेंनी कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही, पण शिरसाटांचा मात्र कोतेपणा दिसून आला. सत्कार नंतर केल्याचा हा राग होता, की मग शिवसेना सोडल्यामुळे आपले महत्व कमी झाले आहे याची जाणीव? हा खरा प्रश्न आहे. भुमरे आणि शिरसाट या दोघांच्या बाबतीत घडलेला हा प्रकार त्यांना आत्मचिंतन करायला लावणारा निश्चितच आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT