Mla Abdul Sattar Wit Cm Eknath Shinde News Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

कुत्रा निशाणी मिळाली तरी निवडून येईल, शिंदेनीच सांगितला सत्तारांचा काॅन्फिडन्स

सत्तारांच्या स्वागताचे हे ओझे घेऊनच त्यांनी सिल्लोड सोडले. राज्य मंत्रीमंडळ विस्ताराच्या हालचाली सध्या सुरू आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेल्यांना पुन्हा संधी मिळेल अशी चर्चा आहे. (Eknath Shinde)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : माजीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड-सोयगांव मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे झालेले स्वागत राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. (Eknath Shinde) शिंदे सत्तारांच्या या स्वागताने अक्षरशः भारावून गेले. मतदारसंघातील सर्व जाती-धर्माच्या लोकांना आपल्याला पाठिंबा असल्याचा सत्तारांचा दावा मुख्यमंत्र्यांनाही पटला. आपल्या भाषणात त्यांनी याचा खास उल्लेखही केला.

तो करत असतांनाच (Abdul Sattar) सत्तार यांना आपल्या विजयाबद्दल किती खात्री आहे, हे सांगतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सत्तार मला म्हणतात कुत्रा निशाणी मिळाली तरी मी निवडून येईल, कारण तो इमानदारीसाठी ओळखला जातो. (Marathwada) माझ्या मतदारसंघातील लोक माझ्या कामाबद्दलच्या प्रामाणिकपणामुळेच मला २५ वर्षांपासून निवडून देतात, असा दावा देखील सत्तार यांनी केला.

सध्या शिंदेसेनेचे भवितव्य काय ? खरी शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाला मिळणार ? यावर चर्चा केली जाते. सिल्लोडच्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी याच मुद्यावरून आम्हाला किंबहूना सोबत आलेल्या आमदारांना याची अजिबात चिंता नाही हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सत्तारांनी केलेल्या दाव्याचा देखील त्यांनी जाहीरपणे उल्लेख केला.

आमदार अब्दुल सत्तार हे सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आले आहे. राजकारणातील सोशल इंजिनिअरिंगमध्ये त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे आपल्या भाषणाचा शेवट ते नेहमी, अदाब, राम राम, जय भीम, जय महाराष्ट्र अशा शब्दानी करतात. महाविकास आघाडी सरकारमध्ये महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री असलेले अब्दुल सत्तार हे कॅबिनेट मंत्रीपदासाठी शिंदे यांच्यासोबत आल्याचे बोलले जाते.

शिंदे यांना आपलसं करून घेण्यात सत्तार अडीच वर्षाच्या काळात यशस्वी झाले होते, हे त्यांना मिळालेल्या भरघोस निधी आणि मंजुर करण्यात आलेल्या विकास प्रकल्पांवरून दिसून येते. त्यानंतर काल झालेल्या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने सत्तार यांनी आपल्या शक्तीप्रदर्शनाने मुख्यमंत्री शिंदे यांना भूरळ घातली. हर्सूल ते सिल्लोड दरम्यान तब्बल ९ ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत, पाच किलोमीटरची मानवी साखळी आणि कार्यक्रमाला हजारोंची गर्दी यामुळे शिंदे चांगलेच भारावले.

सत्तारांच्या स्वागताचे हे ओझे घेऊनच त्यांनी सिल्लोड सोडले. राज्य मंत्रीमंडळ विस्ताराच्या हालचाली सध्या सुरू आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेल्यांना पुन्हा संधी मिळेल अशी चर्चा आहे. पण सत्तार यांना केवळ संधी नाही तर कॅबिनेट मंत्री म्हणून प्रमोशन देखील हवे आहे.

त्यामुळे मुख्यमंत्र्यांसमोर जोरदार शक्तीप्रदर्शन करत सत्तार यांनी आपला दावा आणखी मजबूत केला आहे. माझ्या मतदारसंघात मी म्हणजेच पक्ष हेही सत्तार यांनी दाखवून दिले. सत्तार यांची ताकद मान्य करणारे विधान जाहीरपणे करत मुख्यमंत्र्यांनी देखील हे मान्य केले की काय? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT