Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar Sarkarnama
मराठवाडा

Exit Poll: धोके की खासियत…! फडणवीस-शिंदे-अजितदादांसारखे सक्षम नेते, पण महायुती 30 जागांचा आकडा गाठणार नाही

Jagdish Pansare

Ambadas Danve On Maharashtra Lok Sabha Exit Poll: लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यांतील मतदान संपल्यानंतर शनिवारी (ता.1 जून) एक्झिट पोलचा अंदाज समोर आला आहे. यात देशात पुन्हा मोदी सरकार येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, याचवेळी शिवसेना आणि त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन बलाढ्य पक्ष फोडूनही भाजपला मोठा फटका बसत असल्याचे समोर येत आहे.

राज्यातील जनतेला मोदी- शाहांचे हे फोडाफोडीचे राजकारण रुचलं नसल्याचं आता बोललं जात आहे. शिवाय भाजपमध्ये सामील झालेल्या अजित पवार तर एकनाथ शिंदेंनी आपल्या नेत्यांना धोका दिल्याची भावना, ठाकरे-पवारांना सहानुभूती महायुतीला झटका बसल्याची चर्चा एक्झिट पोलच्या अंदाजानंतर जोर धरू लागली आहे. त्यामुळेच जनतेनं युतीला नाकारलं, यही धोके की खासियत है…! असं विरोधक म्हणत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशातच आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी महायुतीबाबत मोठा दावा केला आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासारखे सक्षम नेते एकत्र असतांनाही महायुतीला 30 जागा जिंकता येणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शिवाय महाराष्ट्रात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला मोठं यश मिळत असून जनमत उध्दव ठाकरेंच्या बाजूने आहे. असं म्हणत दानवे यांनी आम्हाला हा एक्झिट पोल मान्य नसल्याचं म्हटलं आहे.

माध्यमांशी बोलतना दानवे म्हणाले, "देशभरात दाखवण्यात आलेले एक्झिट पोल खोटे ठरतील. मतदानाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मोदींचा तोल घसरला होता. त्यामुळे त्यांना फारसे यश मिळणार नाही. देशपातळीवर भाजपला तीनशे पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत. महाराष्ट्रात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना मोठं यश मिळवत आहे. जनमत उध्दव ठाकरे यांच्या बाजूने आहे.

महाविकास आघाडी 30 जागांवर आघाडी घेत आहे. सर्वेक्षण करणाऱ्या अनेक कंपन्या भाजपच्या बटीक झाल्या आहेत. भाजपच्या देशात व राज्यात शंभर टक्के जागा कमी होणार असून चारशे पार एकाही संस्थेचा सर्व्हे नाही. कर्नाटकमध्ये गेल्यावेळी भाजपचे शासन होते आता काँग्रेस सत्तेवर असून त्यांच्या बाजूने जनमताचा कौल आहे. रेवन्ना प्रकरणामुळे भाजपवर विपरीत परिणाम होणार आहे."

ईव्हीएमबाबत शंका

भाजपला महाराष्ट्रात दाखवण्यात आलेले सर्व्हे चुकीचे ठरणार आहेत. महायुतीतील मित्र पक्ष मिळूनही त्यांच्या 30 जागा येणार नाहीत. फडणवीस सर्वमान्य नेते ते राज्यातील मोठे नेते आहेत, याशिवाय त्यांनी जे नेते एकत्र केले आहेत त्यांची ताकद मिळून सुद्धा त्यांना 30 जागा राज्यात मिळणार नाही? असा दावाही दानवेंनी केला. तर देशपातळीवर भाजपला बहुमतापेक्षा जास्त जागांचा अंदाज वर्तवला जात आहे, त्यामुळे ईव्हीएमबाबत शंका असून सगळ्या मतदान यंत्रावर लक्ष दिले जाणार असल्याचंही दानवे म्हणाले.

तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आणि कोणाला एकही जागा मिळणार नाही, याच्याशी आम्हाला काही देणंघेणं नाही. आम्ही निवडून येत आहोत हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रात 30 प्रचार सभा घेत होते. याकाळात त्यांनी देशाकडे दुर्लक्ष केल्याची टीका दानवेंनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT