<div class="paragraphs"><p>Pankaja-Fadanvis-Pritam Munde</p></div>

Pankaja-Fadanvis-Pritam Munde

 

Sarkarnama

मराठवाडा

Fadanvis: मुंडेसाहेबांचे स्वप्न पूर्ण होत आहे ; पंकजा, प्रितमचेही अभिनंदन..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद ः अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गावर नगर ते कडा या ४१ किलोमीटर अंतरावर बुधवारी बारा डब्यांच्या रेल्वेची चाचणी झाली. (Beed) आज दुपारी चार वाजता आष्टी रेल्वेस्थानकावरून बीडच्या भाजप खासदार डाॅ.प्रितम मुंडे (Dr.Pritam Munde) या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. दिवंगत गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचे बीड जिल्ह्यात रेल्वे आणण्याचे स्वप्न या निमित्ताने साकार होत आहे.

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पकंजा मुंडे (Pankaja Munde) यांनी काल या संदर्भात एक ट्विट करत ` उद्या एक साकार स्वप्न धावणार बीडमध्ये` म्हणत या घटनेबद्दल आनंद व्यक्त केला. अनेक दशक लढाई देणाऱ्या अनेक घटकांचे देखील त्यांनी या निमित्ताने अभिनंदन केले. (Devendra Fadanvis) तर बहिण खासदार प्रितम मुंडे यांच्या नावावर आणखी एक रेकाॅर्ड असे म्हणत त्यांच्या पाठीवरही कौतुकाची थाप दिली.

नगर-बीड-परळी रेल्वे प्रवासात मोलाची साथ आणि योगदान दिल्याचे नमूद करत माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील पंकजा मुंडे यांनी आभार मानले. आमचा शब्द पुर्ण करण्यात योगदान दिल्याबद्दल धन्यवाद, अशा शब्दात पकंजा यांनी या नेत्यांचे आभार मानले.

बीड जिल्हा आणि विशेषतः गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या त्यांच्या लाखो समर्थकांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. पंकजा मुंडे यांच्या ट्विटला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील उत्तर दिले. यात आमचे नेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांचे स्वप्न पुर्ण होत आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पंकजा मुंडे, प्रितम मुंडे तुम्ही केलेल्या पाठपुराव्या बद्दल अभिनंदन व आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे आभार देखील फडणवीस यांनी ट्विटद्वारे व्यक्त केले आहे.

देवेंद्र फडणवीस व पंकजा मुंडे या भाजपमधील दोन नेत्यांमध्ये गेल्या काही वर्षात दुरावा निर्माण झाला होता. विशेषतः परळी विधानसभा निवडणुकीतील पराभव, त्यानंतर विधान परिषद, राज्यसभेवर नाकारण्यात आलेली संधी यामागे फडणवीसांचाच हात आहे, त्यांना ओबीसी नेतृत्व संपवायचे आहे, असा आरोप पंकजा समर्थकांकडून सातत्याने केला गेला.

पंकजा यांच्या मनात देखील फडणवीसांबद्दल अढी निर्माण झाल्याचे त्यांच्या अनेक भाषणातून समोर आले होते. अगदी मी राष्ट्रीय सचिव आहे, त्यामुळे माझे नेते पंतप्रधान मोदी, अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि अमितभाई शहा हेच आहेत, असे सांगत त्यांनी फडणवीसांचे नेतृत्व आपण मानत नाही, असा जणू संदेशच दिला होता.

परंतु नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत फडणवीस यांच्याबद्दल असलेला पंकजा मुंडे यांचा राग कमी झाल्याचे दिसून आले. फडणवीसांचे जाहीर सभेत कौतुक आणि स्तुती करत फडणवीस यांच्याकडून संयम शिकण्यासारखा असून मी त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकले असे विधान पंकजा यांनी केले. गेल्या दीड-दोन वर्षात पकंजा यांनी फडणवीसाबद्दल काढलेले हे गौवरवोद्दगार दोघांच्याही समर्थकांसाठी सुखद धक्का देणारे ठरले होते.

आता फडणवीस यांच्याकडून देखील एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे, असेच त्यांच्या ट्विटवरून म्हणावे लागेल. बीड रेल्वेसाठी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी केलेले प्रयत्न याचे साक्षीदार फडणवीस देखील आहेत. त्यामुळेच मुंडे यांचे स्वप्न जेव्हा प्रत्यक्षात साकार होत आहे, तेव्हा त्यांची आठवण काढणे आणि त्यांच्या मुली पंकजा-प्रितम मुंडे यांनाही या कामाचे श्रेय देण्याचा मोठेपणा फडणवीस यांनी या निमित्ताने दाखवला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT