औरंगाबाद : वैजापूरचे शिवसेना आमदार प्रा. रमेश बोरनारे यांच्याविरुद्ध अखेर भावजयीला मारहाण केल्याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. (Shivsena) भाजपच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याच्या रागातून बोरनारे व त्यांच्यासोबतच नातेवाईकांनी चुलत भाऊ आणि त्याच्या पत्नीला मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. (Bjp) हे प्रकरण संपुर्ण राज्यात गाजले होते, तर विरोधकांनी या प्रकरणात आमदार बोरनारे यांच्याविरोधात वैजापूर पोलिसांनी लावलेले कलम हे त्यांना वाचवणारे आणि दबावातून लावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. (Marathwada)
भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी स्वतः पिडीत महिलेची भेट घेऊन वैजापूर पोलिस ठाण्यात बोरनारे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. महिला आयोगाने देखील या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलिसांकडून अहवाल मागवला होता. त्यानंतर अखेर आमदार बोरनारे यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर पिडित महिलेच्या पुरवणी जबाबानंतर पोलिसांनी विनयभंगाचे कलम लावले. नातेवाईकातील एका व्यक्तीच्या वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमात बोरणारे व त्यांची भावजयी, चुलत भाऊ यांच्यात वाद झाला. काही दिवसांपुर्वी वैजापूरात झालेल्या भाजपच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचा जाब बोरनारे आणि इतरांनी विचारला होता. यातून वादावादी वाढत गेली आणि बोरणारे व इतर नातेवाईकांनी भावजयी व चुलत भावाला लाथाबुक्यांनी खाली पाडून मारल्याचा आरोप करण्यात आला होता.
या मारहाण प्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात आमदार बोरनारे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु नंतर या वादाला राजकीय वळण मिळाले आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपने यात उडी घेत पिडित महिलेला झालेली मारहाण व विनयभंग प्रकरणाची कलम लावून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली गेली. पोलिसांनी राजकीय दबावाखाली विनयभंगाचे कलम लावले नसल्याचा आरोपही करत विरोधी पक्षाने टीका केली होती.
अखेर पुरवणी जबाबानंतर बोरनारे यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे आमदार रमेश बोरनारे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन, त्यात कायदा व सुव्यवस्थेवरून सुरू असलेली वादळी चर्चा या पार्श्वभूमीवर हा गुन्हा दाखल झाल्याने सत्ताधारी शिवसेनेची विरोधकांकडून कोंडी होण्याची शक्यात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.