Pankaja Munde-Dhnanjay Munde
Pankaja Munde-Dhnanjay Munde Sarkarnama
मराठवाडा

आतषबाजी, हारतुरे कशाचा एवढा आनंद झाला? तुम्ही चिखल नाही शेतकऱ्यांच्या भावना तुडवल्या

सरकारनामा ब्यूरो

बीड ः अतिवृष्टीने शेतकरी हतबल झालेला असतांना तुम्ही फटाक्यांची आतषबाजी करत होतात, मोठ मोठे हार घालून परिवार संवाद यात्रेचे स्वागत करत होतात. अन् म्हणे आम्ही चिखल तुडवत शेतकऱ्यांच्या बांधावर गलो. तुम्ही चिखल नाही तर शेतकऱ्यांच्या भावना तुडवल्यात, कशाचा एवढा आनंद झाला होता, असा घणाघात भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता केला.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनात पंकजा मुंडे चांगल्याच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाल्या. त्यांनी राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेवर हल्ला चढवतांनाच धनंजय मुंडे यांनाही खडेबोल सुनावले. जिल्ह्याची मान उंच करणारे काम करा, मी पाठीवर हात फिरवील, बहीण आहे शाबसकी देईन, असेही पंकजा म्हणाल्या.

राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडतांना पंकजा मुंडे म्हणाल्या, अतिवृष्टीने शेतकरी हतबल झाला असतांना दुसरीकडं मात्र यांनी, फटाक्याची आतिषबाजी करत मोठमोठे हार घालून परिवार संवाद यात्रेचे स्वागत केले. असा ओंघळवाना प्रकार कुठं झाला नसेल तो इथं झाला. अधिकाऱ्यांना हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. मोठमोठे गैरव्यवहार देखील केले जात आहेत.

आमच्या जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून या राज्याचे सत्ताधारी स्वतःचे खिसे भरत असतील, माफियांना पोसत असतील तर आम्ही दुर्गेचा अवतार धारण करून सत्ताधाऱ्यांना धडा शिकवू. आज पावणे दोन वर्ष होत आले सत्ता स्थापन होऊन, आम्ही विचार केला की आल्या आल्या यांच्यावर टीकेची झोड नको व्हायला यांना थोडा वेळ दिला पाहिजे. काम करण्याची संधी दिली पाहिजे, अशी भूमिका घेतली.

कारण विरोधीपक्षात असतांना हे इतके भाषण ठोकत होते, की मला वाटलं यांना काही मंत्रीपद मिळालं तर हे समाजाचं कल्याणचं करतील. आणि खातंही तसच मिळालं, त्याच्यापुढं फक्त 'अ' लावायची वेळ आली आहे. म्हणजे समाज अकल्याण मंत्री अशा घटना माझ्या जिल्ह्यात घडत आहेत, असा टोला देखील पंकजा यांनी पालकमंत्र्यांना लगावला.

पहिले पंकजाताईबद्दल तक्रार करायचे, भेटत नाही म्हणायचे, आता तुम्ही कुठं भेटता, तुम्ही कुठं लोकांमध्ये आहे. तुम्ही म्हणता चिखल तुडवला, पाणी तुडवलं, अरे तुम्ही या लोकांच्या आशा आकांक्षा पायदळी तुडवल्या आहेत, त्यांच्या भावना तुडवल्या आहेत. सर्वसामान्य लोकांनी ज्या अपेक्षा सत्ताधाऱ्यांकडून बाळगल्या होत्या त्या सर्व अपेक्षांना पायदळी तुडवण्याचे काम तुम्ही केले आहे.

पंकजाताई अमेरिकेत होत्या, तुमचे लेकरं कुठे आहेत, कशामुळे अशा खालच्या पातळीवर टीका करताय. मी अमेरिकेत होते हे जगालाही माहित आहे, मी स्वतः सांगते मी कुठे आहे. आम्ही हे सगळं करत असताना तुम्ही फक्त आम्ही कुठे आहोत याची नोंद घ्यायचं काम केलं. आम्ही कुठेच नाहीत, आम्हाला जनतेने निवडून दिलं नाही. तुम्हाला निवडून दिलं आहे, त्यामुळे आम्ही कुठे आहोत हे जनता बघून घेईल. तुम्ही कुठे आहात ते बघा आणि तुम्ही काय करताय ते सांगा.

आमच्या काळात कुणाची हिंमत नव्हती..

या बीड जिल्ह्याची बरबादी करण्यासाठी तुमच्या हातामध्ये सत्ता दिलेली नाही. अधिकाऱ्यांना हाताशी धरून तुम्ही घोटाळे करता, तुम्ही लोकांची फसवणूक करत स्वतःचे खिसे भरून अराजकता माजवता, असा आरोप देखील पंकजा मुंडे यांनी केला. बीड जिल्ह्याची जनता हे कधीही सहन करणार नाही.

किती खोट्या अट्रोसिटी केल्या, किती खोटे विनयभंगाचे गुन्हे दाखल केले. खरी ॲट्रॉसिटी, खरा विनयभंग याकडं कुणी लक्ष देत नाही. पोलीस स्टेशनसमोर एकमेकांना तलवारीने मारता, प्रशासनाचा काही धाक आहे का? असा सवाल करत हिम्मत नव्हती आमच्या काळामध्ये असं करायची कोणाची, कारण सर्वांना माहीत होतं, पंकजाताई कुणाला भक्षत नाही, असेही पंकजा म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT