नांदेड : मराठवाड्यातील काही भागांमध्ये सोमवारी मध्यरात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. तर गुलाब चक्रीवादळाचा मोठा फटका नांदेड जिल्ह्याला बसला आहे. गोदावरी नदीने धोक्याची पातळी गाठली असून विष्णुपूरी धरणाचे देखील बारा दरवाजे उघडण्यात आले आहेत. येत्या काही तासात गुलाब चक्री वादळाचा धोका वाढण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
शिवाय येत्या २४ तासात चक्रीवादळासह मुसळधार पावसाची शक्यता देखील वेधशाळेने वर्तवली आहे. सोमवारपासून झालेल्या जोरदार पावसाने जिल्ह्यातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गोदावरी नदीला पूर आला असून नदीजवळील भाग पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. नांदेड शहरातील जुन्या पुलाजवळ ३५१ मीटर पाण्याची पातळी येऊन ठेपली आहे.
त्यामुळे गोदावरी नदी आता धोक्याच्या पातळीजवळ येऊन पोहोचली आहे. गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्पाचे १२ दरवाजे उघडण्यात आले असून साधारणपणे ४ हजार ६९२ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होतो आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प देखील पूर्णपणे भरल्याने या प्रकल्पाचे ११ दरवाजे उघडण्यात आले आहेत. या प्रकल्पातून १८ हजार ७९१ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील धर्माबाद, कंधार, अर्धापूर या तालुक्यासह ३५ मंडळात शंभर मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. आसना नदीला आलेल्या पुरामुळे अर्धापुर तालुक्यातील अनेक शेतीतील पीक पाण्याखाली गेल्याची माहिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.