Governor Haribhau Bagde Sarkarnama
मराठवाडा

Governoer Haribhau Bagde : `माझा तिहेरी सत्कार` हरिभाऊ बागडेंनी इच्छुकांना काढला चिमटा..

Jagdish Pansare

नवनाथ इधाटे

Phulambri Assembly Constituency News : आपल्यावर दिलेली जबाबदारी प्रत्येकाने प्रामाणिकपणे पार पडायला पाहिजे. त्यात यश मिळो अथवा न मिळो प्रामाणिकपणे काम केल्यास जीवनात संघर्षाचा अर्थ कळतो. तुम्ही केलेल्या प्रामाणिकपणाची नक्कीच दखल घेतली जाते. त्यामुळे जी जबाबदारी येईल ती प्रामाणिकपणे पार पाडा, असा सल्ला राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी दिला.

फुलंब्री या आपल्या मतदारसंघात राज्यपाल झाल्यानंतर पहिल्यांदाच आलेल्या आणि वाढदिवस असलेल्या हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) यांचा जंगी सत्कार मतदारसंघाच्या वतीने करण्यात आला. राज्यपाल, वाढदिवस आणि मी निवडणुकीतून बाद झालो, असा माझा तिहेरी सत्कार आज होत आहे, असा टोला इच्छुकांना लगावत बागडे यांनी आपल्या भाषणात धमाल उडवून दिली.

संघाचे काम करत असतांना ज्या ठिकाणी कुणी काम करायला जात नव्हते, अशा ठिकाणी काम करण्यासाठी मी जायचो. जीवनात पहिल्यापासूनच संघर्ष करण्याची सवय असल्याने यश येवो अथवा न येवो, संघर्ष करत राहिलो. तुमच्या कामाची नक्कीच दखल घेतली जाते. आपण केलेल्या प्रामाणिकपणाची पावती मिळतेच, असे सांगत बागडे यांनी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणे काम करत राहण्याचा सल्ला दिला.

आज माझा वाढदिवस, राज्यपाल निवड आणि मी निवडणुकीतून बाद झालो याची आज सर्वांना खात्री पटली आहे. त्यामुळे तिहेरी सत्कार माझ्या करण्यात आला आहे. (BJP) बऱ्याच दिवसापासून लोकांना मी निवडणुकीतून बाद झाले असल्याचे सांगितले मात्र त्यांचा विश्वास बसत नव्हता. आज त्यांना तो विश्वास बसला आहे, असा चिमटाही बागडे यांनी इच्छुकांना काढला.

तर हरिभाऊ बागडे नाना हे चालते बोलते विद्यापीठ आहे. नाना म्हणजे कार्यकर्ता निर्माण करण्याची फॅक्टरीच आहेत. त्यामुळे फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचा कुठलाही निर्णय नानांना विचारल्याशिवाय घेतला जाणार नाही, अशी ग्वाही माजी केंद्रीय रेल्व राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या भाषणात उपस्थितांना दिली.

दरम्यान, फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे सलग तीन टर्म प्रतिनिधित्व करणाऱ्या हरिभाऊ बागडे यांनी आता राजकारणात रिटायर्ड व्हावे, नव्या नेतृत्वाला संधी द्यावी, असा मतप्रवाह मतदारसंघात होता. 2019 मध्येच अनेकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. परंतु हरिभाऊ बागडे यांचा राजकीय अनुभव, ज्येष्ठत्व यातून असलेला आदर पाहता कोणी नानांच्या विरोधात बंडखोरी केली नाही.

पण नानांनी थांबावे अशी, अनेकांची इच्छा होती. नेमका यावरच बोट ठेवत बागडे यांनी आपल्या सत्कार समारंभात मी आता राजकारणातून बाद झालो असल्याची खात्री उपस्थितांना पटवून दिली. या सत्काराचे हे ही एक कारण असल्याचे सांगत त्यांनी इच्छुकांची विकेट घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT