Rajendra Muske Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation : बीड जिल्हाध्यक्षांचा भाजपला घरचा आहेर; म्हणाले, ''सरकारने मराठा समाजाची...''

Rashmi Mane

Maratha Reservation News : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, यासाठी मराठा मनोज जरांगे पाटील यांनी ४० दिवसांनंतर पुन्हा अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले. परंतु, सरकारने दिलेला शब्द पाळला नाही. सरकारने समाजाची फसवणूक करू नये, अन्यथा आरक्षणाचा लढा आरपार होऊ शकतो, असा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिला असून, एकप्रकारे हा भाजपसाठी घरचा आहेरच म्हणावा लागणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

''मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ जिल्हाभरात साखळी उपोषणांना सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाला भेट देऊन राजेंद्र मस्के यांनी भूमिका मांडली. राज्यातील प्रत्येक शहर, गाव, खेड्यात आंदोलन तीव्र झाले. आता आरक्षणाच्या निर्णयासाठी सरकाने वेळकाढूपणा करू नये. कष्टकरी मराठा आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला असून, शिक्षण व नोकरीपासून तरुणपिढी वंचित राहत आहे. आता सरकारने तोडगा काढलाच पाहिजे," असे मतही राजेंद्र मस्के यांनी व्यक्त केले.

याशिवाय ''कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन, आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला द्यावा.'' अशी मागणीही त्यांनी केली. तसेच ''मराठा आरक्षणाचा लढा गेली अनेक वर्षांपासून सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या हाकेला प्रतिसाद देत राज्यातील तमाम मराठा समाज एकवटला. प्रत्येक मराठा माणूस आरक्षणासाठी अंतरमनाने पेटला आहे. अनेक तरुणांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारून आपला जीव गमावला. आतातरी सरकारने जागे व्हावे.'', असे आवाहनही राजेंद्र मस्के यांनी केले.

याचबरोबर ''सरकारने मराठ्यांचा अंत पाहू नये. शिंदे – फडणवीस सरकारने आरक्षण दिल्यास समाज त्यांच्या पालखीचे भोई होऊन आनंदाचा गुलाल उधळतील. राजकीय जोडे बाजूला ठेऊन संवैधानिक पदावरील नेत्यांनी आरक्षणाचा सकारात्मक निर्णय घेऊनच समाजापुढे आले पाहिजे. परंतु आता जर फसवणूक झाली. आरक्षण नाही मिळाले, तर मराठा समाज पेटून रस्त्यावर उतरेल,'' असेही राजेंद्र मस्के म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

SCROLL FOR NEXT