Governor Haribhau Bagde Sarkarnama
मराठवाडा

Governor Haribhau Bagde : राजस्थानच्या राजभवनात बागडेनानांचा मराठी बाणा..

Jagdish Pansare

नवनाथ इधाटे

BJP Political News : भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी विधानसभा अध्यक्ष तथा फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरिभाऊ बागडे नाना राजस्थानचे राज्यपाल झाले आहेत. जनसंघापासून ते आताच्या भाजपमधील त्यांचा प्रदीर्घ राजकीय प्रवास शिस्त, निष्ठा आणि प्रामाणिकपणासाठी ओळखला जातो. भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने त्यांच्या याच निष्ठेचा योग्य सन्मान करत त्यांची नुकतीच राजस्थानच्या राज्यपाल पदासाठी निवड केली.

आमदारकीचा राजीनामा देऊन बागडेनानांनी (Haribhau Bagde) राज्यपाल पदाची शपथ घेतली आणि तात्काळ पदभारही स्वीकारला. राजभवनातील आपल्या दालनात पहिल्यांदा प्रवेश केल्यानंतर हरिभाऊ बागडे यांनी तिथे लावलेल्या तसबिरींवर कटाक्ष टाकला आणि त्यांना काही गोष्टी खटकल्या. शपथविधी झाल्यानंतर काही दिवसानीच बागडेनाना महाराष्ट्रात परतले. मतदारसंघ आणि आपल्या कर्मभूमीत त्याचा यथोचित सत्कार झाला. पाच-सहा दिवसानंतर ते पुन्हा राजस्थानला गेले आणि तिथे जाताच त्यांनी पहिले कुठले काम केले असेल तर ते म्हणजे राजभवनातील दालनात दोन महापुरुषांचे फोटो लावून घेतले.

यात महाराष्ट्राचेच नव्हे तर अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांच्या शौर्याच्या गाथा आजही अभिमाने नव्या पिढिला सांगितल्या जातात, अशा शूरवीर,धर्माभिमानी महाराणा प्रताप यांचे. बागडेनाना यांच्या या कृतीततून मराठी बाणा तर दिसलाच, पण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबतच महाराणा प्रताप यांचाही योग्य सन्मान राखला. बागडेनाना यांच्या दालनात आता छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, महात्मा गांधी, राष्ट्रपती व पंतप्रधान यांचे फोटो आहेत.

इकडे महाराष्ट्रातील सिंधुदुर्गच्या मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी महायुती सरकारवर विरोधक आणि शिवप्रेमी तुटून पडले आहेत. (Maharashtra) अशावेळी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी राजभवनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महाराणा प्रताप याचे छायाचित्र लावून त्यांच्याबद्दल असलेला आदर दाखवून दिला. बागडेनाना यांच्या या कृतीतून मराठी बाण्याचे दर्शन घडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात हरिभाऊ बागडे यांचे वेगळे स्थान आहे. सगळेच राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते बागडे यांच्याकडे आदराने पाहतात. तळागाळापासून काम करत राज्यपाल पदापर्यंत पोहोचणारे बागडेनाना यांनी राजस्थानमध्ये जाताच थेट भारत- पाकिस्तान सीमेवरील गाव गाठून तेथील सैनिकांशी संवाद साधला होता. देशाचे रक्षण करणारे सैनिक भारत- पाकिस्तान सीमेवर कोणत्या परिस्थिती काम करतात? याची बागडे यांनी आस्थेवाईकपणे माहिती घेतली होती.

राजस्थानमधील गोरगरिबांच्या मुलांना हक्काचे शिक्षण मिळावे यासाठी थेट शिक्षण मंत्र्याची बैठक घेऊन त्यांनी शिक्षणापासून एकही मुलगा वंचित राहणार नाही याकडे लक्ष दिले. राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आपल्या कामाचा धडका सुरू केला आहे. अशातच राजभवनात छत्रपती शिवाजी महाराज व महाराणा प्रताप यांच्या प्रतिमा लावून महापुरुषांबद्दल असलेला आदर बागडे यांनी दाखवून दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT