Ex.Mla Harshvardhan Jadhav Join BRS News
Ex.Mla Harshvardhan Jadhav Join BRS News Sarkarnama
मराठवाडा

Harshvardhan Jadhav : स्वतःच्या पक्षात न टिकणारे हर्षवर्धन बीआरएसमध्ये कितीकाळ राहणार ?

Jagdish Pansare

Marathwada Politics : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी नुकताच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश केला. कुणालाही थांगपत्ता न लागू देता जाधव यांनी थेट हैदराबाद गाठले आणि मुख्यमंत्र्यांच्या घरी जावून पक्षात प्रवेश घेतला. धक्कादायक निर्णय घेवून सनसनाटी निर्माण करण्यात माहिर असलेल्या जाधव यांच्या या निर्णयाने देखील ती निर्माण झाली. पण त्याचा परिणाम किती दिवस राहणार, किंवा स्वतःच्या पक्षात न टिकणारे जाधव बीआरएसमध्ये कितीकाळ राहणार याचीच चर्चा सध्या सुरू आहे.

वडिल स्व. रायभान जाधव, आई तेजस्वीनी जाधव यांच्याकडून राजकीय वारसा मिळालेले हर्षवर्धन यांनी आपला राजकारणातील श्रीगणेशा जिल्हा परिषदेपासून केला. (K.Chnadrasekhar Rao) सुरूवातीपासूनच आक्रमक भूमिकेत राहिलेल्या जाधव यांना कन्नड (Marathwada) तालुक्यातील मतदारांनी एकदा नव्हे तर दोनदा विधानसभेवर पाठवले. एकदा मनसेकडून तर दुसऱ्यांदा शिवसेनेच्या तिकीटावर. पण सातत्याने वाद ओढावून घेणाऱ्या जाधव यांचे बस्तान एका पक्षात कधी बसलेच नाही.

मनसेचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेत प्रवेश आणि आमदार झाल्यानंतर जेमतेम अडीच पावणे-तीन वर्ष ते पक्षासोबत राहिले. पण पक्षाचे कार्यक्रम, मोळावे, बैठका यांना ते कधीच हजर नसायचे. जिल्ह्यातील कुठल्याही नेत्याला ते जुमानायचे नाही, आपल्या मतदारसंघाचे आपणच राजे, असं ते नेहमी सांगायचे. त्यामुळे पक्षात असून नसल्यासारखी त्याची गत होती. जिल्ह्यातील नेत्यांशी देखील त्यांचे खटके उडायचे.

तरी देखील उद्धव ठाकरे यांनी जाधव यांना काहीकाळ सांभाळून घेतले. त्यांच्या वडिलांच्या पुस्तक प्रकाशनासाठी कन्नडमध्ये जावून सभा घेतली, खैरे-जाधव यांच्यात दिलजमाई घडवून आणली. पण २०१९ च्या लोकसभा लागल्या आणि जिल्हा परिषदेत पत्नीच्या झालेल्या पराभवाला खैरे यांना जबाबदरा धरत जाधव यांनी बंड पुकारले. शिवसेनेविरुद्ध उमेदवारी दाखल केली, निवडणूक लढले स्वतः हरले आणि शिवसेनेच्या खैरेंना देखील हरवले.

दरम्यान, शिवस्वराज्य पक्ष स्थापन केला, तो गुंडाळला मग स्व. रायभान जाधव विकास आघाडीच्या माध्यमातून काही काळ राजकारण केले. त्यानंतर कौटुंबिक वाद, रावसाहेब दानवे यांच्याशी बिघडलेले संबंध, पुण्यातील मारहाण, गुन्हा, मैत्रीणीशी झालेले वाद अशा अनेक कारणांमुळे हर्षवर्धन कामय चर्चेत राहिले. आता मला राजकारणात काही नको अशी भूमिका, महिनाभरात बदल त्यांनी पुन्हा विधानसभेची तयारी सुरू केली.

ज्या खैरेंच्या पराभवाला कारणीभूत ठरले, त्यांनाच येणाऱ्या लोकसभेसाठी पाठिंबा जाहीर केला. एवढ्यावर हे सगळं थांबेल आणि जाधव २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीत उतरतील अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांना होती. पण आपल्या स्वभावाला साजेसा निर्णय घेत त्यांनी आता थेट परराज्यातील पक्षाचीच निवड केली. सध्या स्वतःच्या सोशल मिडिया अंकाऊटवरून जाधव तेलंगणा आणि त्या राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे व ते राबवत असलेल्या योजनांचे गोडवे गातांना दिसत आहेत.

त्यांच्या या तडकाफडकी निर्णयाची कल्पना समर्थकांनाही नसल्याने अनेकांना त्यांचा हा निर्णय रुचला नाही. पण याची परवा न करणाऱ्या जाधवांनी त्यांना देखील आपला निर्णय कसा योग्य आहे, आणि तुम्ही पक्षात सामील व्हा, असे बजावले. आता तेंलगणा, चंद्रशेखर राव, त्यांच्या योजनांचे भूत हर्षवर्धन यांच्या डोक्यावर किती दिवस राहते? बीआरएसकडून ते विधानभा लढवणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे नजीकच्या काळात मिळतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT