Harshvardhan Jadhav-Uddhav Thackeray News, Aurangabad
Harshvardhan Jadhav-Uddhav Thackeray News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Harshvardhan Jadhav : लोकसभेला शिवसेनेच्या विरोधात लढलेल्या जाधवांना आता उपरती...

Jagdish Pansare

Aurangabad : उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हिरावल्यानंतर त्यांच्या विरोधकांनीही हळहळ व्यक्त केली. पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात लढत एमआयएमच्या विजयाचा मार्ग सुकर करणारे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांना देखील आता उपरती आली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी रक्ताचे पाणी करून वाढवलेली शिवसेना (Shivsena) आणि त्या पक्षाचे धनुष्यबाण शिंदे गटाला मिळाल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला आहे. (Uddhav Thackeray) एक व्हिडिओ व्हायरल करत शिवसेना पक्षाला सध्या ग्रहण लागले आहे, या काळात सगळ्यांनी आपल्याला जपत उद्याच्या सुर्योदयाची वाट बघावी, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.

हर्षवर्धन जाधव हे नेहमीच आपल्या भूमिका बदलण्याबद्दल ओळखले जातात. घटकेत राजकारण करायचे नाही असे जाहीर करतात अन् काही दिवसांत पुन्हा विधानसभेच्या तयारीला लागलो असे सांगतात. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेविरुद्ध लढत त्यांनी हिंदू मतांमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पाडण्यास हातभार लावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

२ लाख ८३ हजार एवढी मते त्यांनी घेतल्यामुळे औरंगाबादेत शिवसेनेचा पराभव झाला आणि एमआयएमने विजय मिळवला. अर्थात याची शिक्षा मतदारांना लगेच विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांचा दारूण पराभव करत दिली. त्यामुळे सध्या जाधव हे पुन्हा उद्धव ठाकरेंशी जुळवून घेवू पाहत आहेत. चिन्ह आणि पक्षाचे नाव गमावल्यानंतर जाधव यांनी एक व्हिडिओ जारी केला.

त्यात ते म्हणतात, बाळासाहेब ठाकरेंनी ज्या शिवसेना आणि धनुष्यबाणासाठी रक्ताचे पाणी केले, ते आता शिंदे गटाला मिळाले आहे. हे एक मोठे षडयंत्र आहे, ते ठाकरेंच्या शिवसैनिकांनी वेळीच ओळखलं पाहिजे. रात्र वैऱ्याची आहे, पक्षाला सध्या ग्रहण लागले आहे, अशावेळी सावध पावले उचलण्याची गरज आहे. ग्रहणानंतर पुन्हा सुर्योदय होईल, त्यासाठी शिवसैनिकांनी आतापासूनच तयारीला लागावे.

ज्यांनी पक्षाचे चिन्ह आणि नाव पळवले त्यांनी नीट करण्याची संधी येणारच आहे, तेव्हा तयारीला लागा. मी काही शिवसैनिक नाही, पण बाळासाहेब ठाकरेंचा चाहता आहे, त्यामुळे निवडणूक आयागोच्या निर्णयाचे मलाही दुःख झाले, असेही जाधव म्हणतात. कन्नड विधानसभा मतदारसंघातून पुन्हा आमदार होण्याचे जाधव यांचे स्वप्न आहे.

संजना जाधव यांच्याकडूनच त्यांना आव्हान दिले जात आहे, अशावेळी नमते घेत जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी जुळवून घेण्याचा तर हा त्यांचा प्रयत्न नाही ना? मध्यंतरी २०२४ च्या लोकसभेत चंद्रकांत खैरे हेच खासदार होणार, माझा त्यांना पाठिंबा असेल, अशी भूमिका जाधव यांनी जाहीर केली होती. आता भविष्यात ते आणखी काय भूमिका घेतात हे पहावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT