Shivsena UBT News : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची लवकरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात 'वापसी' होणार आहे. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जाधव यांना घेऊन शुक्रवारी थेट मातोश्री गाठली. काही दिवसांपूर्वी दानवे हे हर्षवर्धन जाधव यांच्या घरी गेले होते. तिथे या दोघांमध्ये बरीच चर्चा झाली होती. जाधव यांचा संभाव्य पक्षप्रवेश माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना धक्का मानला जात आहे. त्यामुळे खैरेंकडून या प्रवेशाला तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे.
हर्षवर्धन जाधव हे 2009 ते 2014 मनसेचे आमदार होते. मनसेतून बाहेर पडल्यानंतर जाधव हे 5 वर्ष शिवसेनेत होते. कन्नड विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांनी त्यांना उमेदवारीही दिली होती. शिवसेनेचे आमदार म्हणून काम केल्यानंतर 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी जाधव यांनी तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात अपक्ष निवडणूक लढवली. यातून हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होऊन एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आल्याचा दावा आजही खैरे करतात.
जाधव यांनी 2024 मधील विधानसभेचीही निवडणूक लढवली होती. आता सलग 2 पराभव झाल्याने हर्षवर्धन यांना आता पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात घरवापसी करायची आहे. अंबादास दानवे यांनी याच अनुषंगाने जाधव यांची भेट घेतली होती. या भेटीची माहिती जिल्ह्यातील दुसरे नेते चंद्रकांत खैरे यांना कळताच त्यांनी संताप व्यक्त केला.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी उद्धव ठाकरे आणि पक्षावर खालच्या पातळीवर केलेल्या टीकेची आठवण करून देत चंद्रकांत खैरे यांनी आपण कुठल्याही परिस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश होऊ देणार नाही, असे जाहीर केले होते. खैरे यांनी आक्रमक पावित्रा घेऊन काही तास उलटत नाही तोच हर्षवर्धन जाधव यांना घेऊन अंबादास दानवे यांनी आज थेट मातोश्री गाठली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. याच दरम्यान, अंबादास दानवे यांनी हर्षवर्धन जाधव आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट आणि चर्चा घडवून दिल्याची माहिती आहे. हर्षवर्धन जाधव यांच्या पक्षप्रवेशाला अद्याप हिरवा कंदील मिळाला नसला तरी तो निश्चित असल्याचे बोलले जाते. खैरे यांनी विरोध केला म्हटल्यावर, अंबादास दानवे हा प्रवेश निश्चित घडवून आणणार अशीही चर्चा आहे.
खैरेंचा विरोध का?
2019 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधीच तेव्हा शिवसेनेत असलेल्या आमदार हर्षवर्धन जाधव यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना विरोध सुरू केला होता. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत खैरेंनी आपल्या विरोधात कन्नड तालुक्या प्रचार केला, त्यामुळे आमचा पराभव झाला असा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला होता. याशिवाय खैरे यांच्या खासदार निधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे, कामे न करताच बिले उचलण्यात आली आहेत, असा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी पत्रकार परिषद घेत केला होता.
एवढ्यावरच न थांबता हर्षवर्धन जाधव यांनी थेट शिवसेनेला जय महाराष्ट्र करत चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवली. 2 लाख 83 हजारांवर मत मिळवत जाधव यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत विरोधात केलेल्या कामाचा वचपा थेट लोकसभेत खैरेंच्या पराभवाला हातभार लावत काढला. हिंदू मतांमध्ये मोठा प्रमाणत फूट पडल्याने खैरे पराभूत झाले आणि एमआयएमचे इम्तियाज जलील हे खासदार झाले होते.
तेव्हापासून खैरे आणि जाधव यांच्यातून विस्तव देखील जात नाही. आता त्याच हर्षवर्धन जाधव यांना खैरे यांचे पक्षांतर्गत विरोधक असलेल्या अंबादास दानवे यांनी पुन्हा पक्षात घेण्याचा घाट घातला आहे. सलग 2 लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर चंद्रकांत खैरे यांना पक्षात कायम दुय्यम स्थान दिले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून खैरेंची निष्ठा, मराठवाड्यात शिवसेना वाढवण्यासाठी त्यांनी उपसलेले कष्ट या सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवत त्यांचा योग्य सन्मानही राखला जातो.
पक्ष फुटल्यानंतरही भाजपकडून शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे खेचण्याचे शिवसेना आणि भाजपचे प्रयत्न आहेत. कुरघोडीच्या या राजकारणात विरोधकांना जशासतसे उत्तर द्यायचे असेल तर काही तडजोडीही स्वीकारण्याची भूमिका पक्षप्रमुखांनी घेतली आहे. त्याच धोरणानुसार कन्नडमध्ये 2029 ची विधानसभा डोळ्यासमोर ठेवून हर्षवर्धन जाधव यांना पुन्हा पक्षात घेऊन आतापासूनच मतदारसंघाची नव्याने बांधणी करण्याचा प्रयत्न आहे. आता चंद्रकांत खैरे यांचे मत परिवर्तन उद्धव ठाकरे कसे करतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.