औरंगाबाद : सोयगांव नगरपंचायत निवडणुकीत बहुमतासह सत्ता मिळवल्यानंतर शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) चांगलेच खुषीत आहेत. विजयी जल्लोष करतांना त्यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना भुईसपाट केल्याची प्रतिक्रिया दिली. (Shivsena ) एवढेच नाही तर आपल्या नेहमीच्या टोपीचा उल्लेखही केला. (Bjp)
सोयगाव निवडणुकीत भाजपचा झालेला पराभव म्हणजे माझ्या डोक्यावरची टोपी काढण्याचे पहिले पाऊल असल्याचे सत्तार यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. ज्या दानवेंना पराभूत करण्याची भाषा सत्तार वारंवार करतात प्रत्यक्षात जालना लोकसभा निवडणुकीत दानवे यांना तेच मदत करतात हे काही लपून राहिलेले नाही.
सोयगांव नगरपंचायत निवडणुकीत गेल्यावेळी भाजप-सेनेची सत्ता होती. दानवेंच्या लोकसभा आणि सत्तार यांच्या विधानसभा मतदारसंघातील ही नगरपंचायत असल्यामुळे ती दोघांसाठीही महत्वाची होती. पण `दोस्ती इम्तहान लेती है`, म्हणतात त्या प्रमाणे दानवेंनी सत्तार यांच्यासाठी ही परिक्षा दिली असेच म्हणावे लागेल.
सोयगांव नगर पंचायतीसाठी येणारी २०२४ ची निवडणुक आणि त्यात सत्तार यांच्याकडून होणारी मदत धोक्यात घालण्या इतके दानवे कच्चे खिलाडी निश्चितच नाही. त्यामुळे तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या समाधानासाठीच ही निवडणूक लढवली होती का? असा प्रश्न या पक्षाला मिळालेल्या मर्यादित यशावरून पडतो.
भाजपला सहा जागा मिळाल्या आहेत, तर काही जागा थोड्या मतांच्या फरकाने गेल्याचा दावा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे. पण या भाबड्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या आधी सत्तार-दानवे यांच्यात दिल्लीत झालेल्या गळाभेटीचा अर्थ बहुदा अजूनही समजलेला नाही. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, टीका करायची आणि आपले समर्थक बांधून ठेवायचे ही यशस्वी खेळी दानवे-सत्तार गेल्या अनेक वर्षांपासून खेळत आले आहेत.
त्यामुळे दोस्ती पक्की, सत्ता आपली आपली असेच काहीसे धोरण या दोन्ही नेत्यांचे दिसते. सहा जागा जिंकल्याच्या आनंदात भाजपचे पदाधिकारी असले तरी सत्तार यांनी १७ पैकी ११ जागा जिंकत इथे आपलाच शब्द चालणार हे दाखवून दिले आहे. राहिला प्रश्न टोपी निघण्याचा, तर आपल्या समर्थकांना खूष करण्यासाठी त्यांनी घातलेली ही एक टोपीच म्हणावी लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.