Chhatrapati Sambhajinagar : कुख्यात गुन्हेगार इम्रान मेहंदी ऊर्फ दिलावर शेख नासीर याच्या जन्मठेपेच्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संदीपकुमार सी. मोरे आणि न्या. वैशाली पाटील-जाधव यांनी स्थगिती देत अपिलाचा निकाल लागेपर्यंत त्याला २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि तेवढ्याच रकमेच्या जामिनावर सोडण्याचे आदेश दिले.
इम्रान मेहंदी (५५, रा. आसेफिया कॉलनी) याला विशेष मकोका न्यायालयाने १ ऑगस्ट २०१८ रोजी खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप सुनावली होती. या शिक्षेविरोधातील अपील प्रलंबित असताना शिक्षा स्थगित करून जामीन मिळावा, यासाठी त्याने उच्च न्यायालयात अर्ज केला होता. इम्रानतर्फे ॲड. रूपेश जयस्वाल यांनी युक्तिवाद करताना, या प्रकरणात थेट पुरावा किंवा मृत व्यक्तीला शेवटचे पाहिल्याचा पुरावा नसल्याचे सांगितले.
सहआरोपी सय्यद जाहीर याच्या जबाबावरून इम्रानचा सहभाग निष्पन्न करण्यात आला. इम्रानच्या सांगण्यावरून चाकू जप्त केल्याचा पुरावा वगळता त्याच्याविरुद्ध अन्य ठोस पुरावा नसल्याचे त्यांनी मांडले. याच पुराव्याच्या आधारे अन्य पाच आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. ए. एस. शिंदे यांनी अर्जाला विरोध केला.
इम्रान हा परिसरातील कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल असल्याचे त्यांनी सांगितले. खुनाच्या गुन्ह्यात दोषसिद्धीनंतर शिक्षा स्थगित करणे हा अपवाद असल्याचा युक्तिवाद करीत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार घेतला. मात्र, खंडपीठाने मूळ कागदपत्रे आणि निकालपत्र तपासल्यानंतर त्याची शिक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
काय आहे प्रकरण?
बेगमपुरा पोलिस ठाण्यातील गुन्ह्यानुसार, ९ सप्टेंबर २०११ रोजी शेख नासेर शेख चांद यांना गुंगीचे औषध मिसळलेला ज्यूस पाजून, गळा आवळून आणि चाकूने वार करून ठार करण्यात आले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी सावंगी येथील इरफान फार्म हाऊसच्या गट क्रमांक ३२ मधील जमिनीत मृतदेह पुरण्यात आला. घटनेनंतर सुमारे सात महिन्यांनी, १२ मार्च २०१२ रोजी गुन्हा दाखल झाला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.